Akola News अकोला : जमिनीच्या वादातून एकाची गाढ झोपेत असतानाच लाठीकाठी आणि कुर्हाडीनं वार करून निर्घृणपणे हत्या (Crime) केल्याची घटना समोर आलीय. ही धक्कादायक घटना अकोला (Akola Crime News) जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या बटवाडी गावात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बटवाडी गावातील सरकारी जागेवरील ताब्यावरुन तीन कुटुंबीयामध्ये वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद काल 31 मार्चच्या रात्री अचानक उफाळून आला.  कालांतराने हा वाद इतका विकोपाला गेला की, रात्री साडेअकरा पर्यंत शाब्दिक वाद सुरू होता आणि मध्यरात्रीनंतर दुसऱ्या कुटुंबातील काहींनी आखरे कुटुंबातील एकावर प्राणघातक हल्ला करत त्याला संपवलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बाळापुर पोलिसांनी (Akola Police) तात्काळ घटनास्थाळ गाठत आतापर्यंत दहा लोकांना ताब्यात घेतले आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


नेमकं प्रकरण काय ?


अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या बटवाडी गावात आखरे, पुंडे आणि कुटे हे तीन कुटुंब वास्तव्यास आहे. या तिन्ही कुटुंबामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारी जागेवरील ताब्यावरुन वाद सुरू होता. दरम्यान, काल आखरे कुटुंबातील एकानं या जागेवर घर बांधकामामुळे खत आणून टाकलं होतं. तर त्या खतावरच दुसऱ्या कुटुंबीयांनी जनावर आणून बांधून ठेवले होते. त्यावरून तिन्ही कुटुंबीयांमध्ये रात्री साडे 11 पर्यंत वाद सुरू होता. बराच वेळ सुरू असलेला हा शाब्दिक वाद अखेर रात्री पावणे बाराच्या सुमारास मिटला आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. मात्र, आखरे कुटुंबातील नितीन सुधाकर आखरे (33) हे घराच्या अंगणात बाहेर झोपले असताना काही अज्ञात लोकांनी येऊन त्यांना लाठीकाठीने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत अखेर त्यांचा मृत्यू झाला. 


दरम्यान आज पहाटे 4 वाजता मृत नितीन यांची पत्नी नेहमीप्रमाणे  कामावर जाण्यासाठी घरातून जात असताना  नितीन यांना झोपेतून उठवण्यासाठी आल्या.  तेव्हा त्यांना नितीन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हे पाहताच त्यांना जबर धक्का बसला आणि त्यांनी एकच टाहो फोडला. अल्पावधीतच  संपूर्ण गाव त्याठिकाणी जमा झाले. दरम्यान, जमलेल्यांनी या घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. 


 दोन कुटुंबातील दहा लोकांना अटक 


दरम्यान, या वादतील इतर कुटुंबियांनी आखरे कुटुंबियांना जिवानिशी संपवून टाकण्याची धमकी दिली होती. त्यातूनच हे कृत्य घडल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी इतर दोन कुटुंबातील दहा लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच लाठीकाठी आणि कूर्हाडीनं नितीन आखरे याच्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास बाळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात एपीआय कांबळे करीत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या