Prime Video Jackie Shroff : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत.  इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनेक वेब सीरिज, चित्रपट डब केले जातात. त्यामुळे अनेक जगातील उत्तमोत्तम कलाकृती लोकांना आपल्या भाषेत पाहता येत आहेत. तर, दुसरीकडे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) आता बॉलिवूडचा जग्गू दादा अभिनेता  जॅकी श्रॉफच्या (Jackie Shroff) आवाजात काही वेब सीरिज डब होत असल्याचा व्हिडीओ लाँच केला आहे.  या खास मोडला 'जग्गूदादा मोड' असे नाव देण्यात आले आहे.


पण ही नेमकी भानगड काय?


अभिनेता जॅकी श्रॉफ हा ऑफ स्क्रीन अतिशय मनमोकळेपणाने चाहत्यांशी संवाद साधतो. पापाराझी, चाहते, मुलाखतीत संवाद साधताना जॅकी श्रॉफ खास मुंबईय्या भाषेचा वापर करतो. त्यामुळे अनेकांना तो आपलासा वाटतो. आता प्राईमने आपल्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडीओ पोस्ट करत खास जग्गूदादा मोड असल्याचे म्हटले आहे. 


जग्गूदादा मोडमध्ये पाताल लोक, द फॅमिली मॅन, ज्युबलीपासून ते काही हॉलिवूड वेब सीरिज डब करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. जॅकी श्रॉफ खास आपल्या शैलीत, मुंबईय्या भाषेत संवाद साधताना दिसत आहे. त्यामुळे अनेक संवाद हे विनोदी ढंगाचे झाल्याचे दिसते. 







नेमकं खरं काय?


अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया आल्या. अनेकांना हा प्रयोग आवडला. तर, काहींनी या व्हिडीओत असलेल्या खास संवादाला दाद दिली आहे. पण जे दिसतंय तसे नाही. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने  आपल्या चाहत्यांना एप्रिल फूल करण्यासाठी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्राईमच्या व्हिडीओच्या सगळ्यात शेवटी अतिशय बारीक अक्षरांमध्ये या एप्रिल फूलची माहिती आहे. तर, दुसरीकडे काही चाणाक्ष, सतर्क प्रेक्षकांनीदेखील ही बाब पकडली आहे. अनेकांनी एप्रिल फूल असल्याचे सांगितले. तर, काहीजण या एप्रिल फूलमध्ये अडकले. काहींनी अॅपवर पाहिले पण जग्गूदादा मोड दिसला नसल्याचे सांगितले. तर, काहींनी या प्रयोगाबद्दल प्राईम व्हिडीओचे कौतुक केले. 


 


इतर संबंधित बातमी :