परभणी : हॉटेलमध्ये नाश्ता देण्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर हॉटेल चालकाने हाणामारीत ग्राहक तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परभणीच्या जिंतूरमध्ये  ही घटना घडली असून त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण  निर्माण झाले होते. मात्र पोलीस अधीक्षकांनी स्वतः जिंतूरमध्ये जाऊन प्रकरण हाताळले. दरम्यान या प्रकरणी हॉटेल मालकासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. 


नाश्त्यावरून वाद


महाराष्ट्र सुरक्षा बल मुंबईत नोकरी करणारे शेख अजगर शेख ख्वाजा हे सुट्टीनिमित्त त्यांच्या जिंतूर तालुक्यातील केळी या गावी आलेले होते. ते परत मुंबईकडे जाण्यासाठी गावातून निघाले होते. जिंतूर मधील सपना हॉटेल येथे नाश्ता करण्यासाठी गेले होते. नाश्ता देण्यासाठी घाई का करतोय म्हणत शेख अजगर यांचा हॉटेल मालक शेषराव आव्हाड, त्यांचा मुलगा अमोल आव्हाड, बालाजी रणखांबे, इम्रान कुरेशी यांच्याशी वाद झाला.


रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू


हा वाद वाढला आणि त्यातून मारहाण सुरु झाली. त्यानंतर हॉटेलचालक आणि इतर तीन जणांच्या मारहाणीत शेख अजगर गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून घोषित करण्यात आलं. 


तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल


या प्रकरणाची माहिती पसरताच जिंतूर मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिंतूरला जात परिस्थिती हाताळली. पोलिसांनी हॉटेल चालकासह एकुण तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या जिंतूरमध्ये शांतता असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे.


ही बातमी वाचा: