अहमदनगर : निर्भया हत्येप्रकरणी चर्चेत आलेले कोपर्डी गाव हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi Youth Suicide ) येथे तमाशात नाचण्यावरून वाद झाला आणि त्यातून झालेल्या मारहाणीमुळे अपमानित झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या (Nitin Shinde Suicide) केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नितीन शिंदेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तमाशात नाचण्यावरून वाद
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे भैरवनाथ यात्रेमध्ये तमाशात नाचण्यावरून तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. या वादात विठ्ठल उर्फ नितीन शिंदे या तरुणाला गावातील तीन युवकांनी स्मशानभूमीत नेऊन मारहाण केली. या सर्व घटनेमुळे अपमानित झालेल्या विठ्ठल उर्फ नितीन शिंदे याने आत्महत्या केली. विठ्ठलच्या खिशात एक चिठ्ठी सापडल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान याप्रकरणी विठ्ठल शिंदेच्या वडिलांनी कर्जत पोलिसात कोपर्डी गावातील दिनेश सुद्रिक ,स्वप्नील सुद्रिक आणि वैभव सुद्रिक या तीन जणांवर ॲट्रॉसिटी आणि आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरण निर्भया केसशी संबंधित?
विठ्ठल उर्फ नितीन शिंदे हा कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेचा चुलत भाऊ आहे. नितीन शिंदे याला मारहाण करणाऱ्यांमध्ये निर्भयाचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैभव सुद्रीक आणि स्वप्नील सुद्रीक या दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तर तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
घडलेल्या घटनेमुळे नितीन शिंदेचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. सर्व आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत नातेवाईकांनी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
असे प्रकार आमच्यासोबत वारंवार होत असल्याचं मृतक विठ्ठल उर्फ नितीन शिंदेच्या वडिलांनी म्हटले आहे. सोबतच आपल्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
सध्या कोपर्डी येथे तणावपूर्ण शांतता आहे. मात्र कर्जत पोलीस स्टेशन परिसरात मृतक नितीन शिंदेचे नातेवाईक ठिय्या मांडून बसले आहेत.
ही बातमी वाचा: