Crime News : एका 19 वर्षीय मुलीला तिच्या वर्गमित्रांनी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विष देऊन ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या जयपुरमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु झाला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

पीडित मुलीच्या वडिलांनी हलेना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, भरतपूर येथील एका खासगी महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या मुलीचे पाच वर्गमित्र तिला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते आणि तिने यास नकार दिल्याने त्यांनी तिला विष पाजले.

या संदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हलेनाचे एसएचओ विजय सिंह यांनी सांगितले की, बुधवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 328 (विषाने दुखापत करणे) आणि 341 (चुकीच्या संयमाची शिक्षा) अंतर्गत सदर युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पीडितेच्या व्हिसेराचे नमुने फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, तपास सुरू करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या तक्रारीत, पीडितेच्या वडिलांनी आरोप केला आहे की, मंगळवारी हलेना शहरात आपल्या आजी-आजोबांसोबत राहणाऱ्या त्यांच्या मुलीने तिच्या आईला फोन करून सांगितले की, महाविद्यालयातील काही विद्यार्थी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. तिला त्रास देत आहेत.’

तक्रारीनुसार, ही मुले पीडितेवर अपमानास्पद शेरेबाजी करत असत. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 3च्या सुमारास, ती घरी परतत असताना या युवकांनी तिचा पाठलाग केला आणि तिला जबरदस्तीने काहीतरी द्रव प्यायला लावले. घरी पोहोचल्यावर तिला उलट्या होऊ लागल्या. या मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :