Why Share Market Crash : भारतीय शेअर बाजारात आजही घसरण कायम राहिली. शेअर बाजार सुरू होताच घसरण सुरू झाली. सेन्सेक्स 1000 अंकानी कोसळला.  शेअर बाजारात आज झालेल्या या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला. बाजारातील घसरणीत पाच लाख कोटींचा चुराडा झाला आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार घसरणीचे सत्र सुरू आहे.


मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल 5.16 लाख कोटी रुपयांनी घसरून 241.15 लाख कोटी रुपये झाले आहे. त्याआधीच्या सत्रात 246.31 लाख कोटी इतके बाजार मूल्य होते. तर, 11 एप्रिल रोजी बीएसईचे बाजार भांडवल 275.17 लाख कोटी रुपये इतके बाजार भांडवल मूल्य होते. 


>> आज शेअर बाजारात घसरण का झाली? 


> अमेरिकेतील महागाई 


अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षे इतका कमी न झाल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. मार्च महिन्यात अमेरिकेतील महागाईचा दर 8.5 टक्के इतका होता. एप्रिल महिन्यात महागाई दर 8.3 टक्के इतकाचा झाला. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला महागाई वेढा घातल्याने बाजारात चिंतेचे वातावरण आहे. 


महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून आगामी बैठकीत व्याज दर वाढवण्याची शक्यता आहे. आगामी बैठकीत व्याज दरात किंचीत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. 


> डॉलर वधारला, आशियाई बाजारात घसरण


अमेरिकेतील एप्रिल महिन्यातील महागाई दर जाहीर झाल्यानंतर डॉलरने जवळपास दोन दशकातील उच्चांक गाठला आहे. जगातील सहा प्रमुख चलनाचा समावेश असलेल्या ग्रीन बास्केटचा दर 103.92 वर पोहचला. 


आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक विभागाचा निर्देशांक असलेल्या MSCI निर्देशांकात 0.92 टक्क्यांची घसरण झाली आहे. जपानमधील नेक्कई निर्देशांकात 1.01 टक्क्यांची घसरण झाली आहे. हाँगकाँग शेअर बाजाराचा निर्देशांक हँगसेंगमध्ये 1.05 टक्के आणि दक्षिण कोरियाचा निर्देशांक कोस्पीमध्ये 0.36 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. 


> परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्री


परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून (FPIs)मोठ्या प्रमाणावर शेअर्स विक्री सुरू आहे. परदेशी गुंतवणुकदारांकडून बुधवारी 3,609.35 कोटींची विक्री करण्यात आली. परदेशी गुंतवणुकदारांनी ऑक्टोबर 2021 पासून शेअर विक्रीचा सपाटा सुरू केला आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे. 


> भारताचा महागाई दर 


अमेरिकेप्रमाणे भारताच्या महागाई दरावर गुंतवणुकदारांचे लक्ष असणार आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा 7.50 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात हा दर 6.95 टक्के इतका होता.