मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी भारताच्या आगामी पतधोरणाविषयी (Monetary Policy) माहिती दिली. महागाई, जागतिक पटलावर घडणाऱ्या घडामोडी लक्षात घेऊन आरबीआयने यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दरम्यान, भविष्यातील अस्थिरता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन गेल्या काही काळापासून आरबीआयकडून विदेशी चलनसाठा (Forex Reserves) वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आरबीआयकडून सोने या मौल्यवान धातुचा साठा (Gold Purchasing) केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2024 साली जानेवारी महिन्यात आरबीआयने तब्बल 8.7 टन सोने खरेदी केलेले आहे. 


सुवर्णसाठ्यात आठ पटीने वाढ


आरबीआयच्या चलनविषय धोरण समितीची 5 एप्रिल रोजी बैठक झाली. या बैठकीनंतर शक्तिकांत दास यांनी भारताची आर्थिक स्थिती, आर्थिक आघाडीवर भारताची वाटचाल, धोरण यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी भारताच्या तिजोरीत असलेली परकीय गंगाजळी आणि सोन्याच्या साठ्यावरही भाष्य केलं. देशातील सुवर्णसाठ्यात गेल्या वर्षभरात आठ पटीने वाढ झालेली आहे.


परकीय चलनसाठ्यातील सोन्याचे मूल्य 51.48 अब्ज डॉलर्स


अधिकृत आकडेवारीनुसार 22 मार्च 2024 पर्यंत भारताकडे असलेल्या परकीय चलनसाठ्यात सोन्याचे मूल्य हे 51.48 अब्ज अमेरिकी डॉलर्स होते. अजूनही सोन्याचा साठा वाढवण्यावरच आरबीआयकडून भर दिला जात आहे. रिझर्व्ह बँकेने जानेवारी महिन्यात 8.7 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही खरेदी गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी खरेदी आहे. 


भारताकडे तब्बल 812 टन सोनं?


वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या (WGC) म्हणण्यानुसार गेल्या चार ते पाच वर्षांपासून भारताकडून सोन्याचा संचय करण्यावर विशेष भर दिला जात आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी आणि आर्थिक संकटाशी तोंड देता यावे म्हणून सोने खरेदी केली जत आहे. दुसरीकडे  भारताच्या परकीय गंगाजळीतही विक्रमी वाढ झाली आहे. 29 मार्च 2024 पर्यंत भारताकडे असलेले परदेशी चलन हे 645.6 अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.  


रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय


दरम्यान रिझर्व्ह बँकेकडून दर दोन महिन्यांनी पतधोरणाचा आढावा घेतला जातो. त्यसाठी विशेष बैठकीचे आयोजन केले जाते. यावेळच्या बठकीत आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्य घेतला. यावेळीतरी रेपो दरात कपात करून सर्वसामान्य कर्जधारकांना दिलासा दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आरबीआयने यावेळीही रेपो दरात कोणतीही कपात केलेली नाही. सध्या रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर आहे.


हेही वाचा :


'या' शेअरने वर्षभरात दिले तगडे रिटर्न्स, तब्बल 271 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या A टू Z माहिती!


लाखो रुपयांचे बिटकॉइन्स, विदेशी शेअर बाजाराची आवड; शशी थरुर यांच्या गुंतवणुकीचा फंडा पाहून चकित व्हाल!


कधीकाळी नवरा चालवायचा टॅक्सी, आज आहेत अब्जाधीश; फोर्ब्सच्या यादीत समावेश झालेल्या रेणुका जगतियानी कोण आहेत?