मुंबई : मुदत ठेव अर्थात एफडी हा गुंतवणुकीचा असा पर्याय आहे, ज्यात जोखमी नसते. वेगवेगळ्या बँका ग्राहकांना मुदत ठेवीच्या (What Is FD) माध्यमातून चांगला परतावा देतात. प्रत्येक बँकेचा मुदत ठेवीवरील व्याजदर हा वेगळा असतो. दरम्यान, सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीपर्यंत एफडी करता येते. दरम्यान, या एफडीचे नेमके काय फायदे आहेत? हे जाणून घेऊ या.. 


प्री-मॅच्यूअर विदड्रॉअलची सोय 


एफडीचे प्रामुख्याने पाच फायदे आहेत. यामधील पहिला फायदा हा तुम्ही एफडीमध्ये गुंतवलेले पेसै आपत्कालीन काळात काढून घेऊ शकता. यालाच प्री-मॅच्यूअर विदड्रॉअल म्हटले जाते. तुम्हाला प्री-मॅच्यूअर विदड्रॉलच्या माध्यमातून एफडीतून पैसे काढायचे असतील तर बँकेला काही चार्जेस द्यावे लागतात. प्रत्येक बँकेसाठी हे चार्जेस वेगळे असतात. याच सुविधेमुळे लोक एफडीमध्ये पैसे गुंतवण्याच्या पर्यायाला निवडतात. 


एफडीवर मिळते कर्ज 


तुम्ही केलेल्या एफडीवर तुम्हाला कर्जदेखील मिळते. तुम्हाला पैशांची गरज भासल्यास एफडी तोडण्याची गरज नाही. तुम्ही या एफडीवर कर्ज घेऊ शकता. सामान्यपणे तुम्ही जेवढी एफडी केलेली असते त्याच्या  90 टक्के रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून मिळू शकते. एफडीवर काढलेल्या कर्जावर काही व्याज द्यावे लागते. 


ठोस व्याजदर मिळणार 


एफडीमध्ये तुम्ही तुम्ही काही पैसे गुंतवल्यावर त्या पैशांवर तुम्हाला ठोस व्याज मिळते. म्हणजे भांडवली बाजारातील स्थितीनुसार या व्याजदरात बदल होत नाही. म्हणजेच तुम्ही एफडीच्या माध्यमातून गुंतवलेल्या पैशांवर गॅरंटीड व्याज मिळते. या व्याजदरात वाढही होत नाही, तसेच हा व्याजदर कमीही होत नाही. 


एफडीचे अनेक ऑप्शन्स 


एफडी करताना तुमच्यापुढे अनेक ऑप्शन्स असतात. सामान्यपणे एफडी सात दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी करू शकता. एसबीआयमध्ये कमीत कमी 100 रुपयांची एफडी करता येते. एसबीआयमध्ये जास्तीत जास्त एफडी करण्याची कोणतीही सीमा नाही. 


रिस्क फ्री गुंतवणूक 


Fixed Deposit हा देशातील सर्वांत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. तुम्ही एफडी केलेल्या बँकांवर आरबीआयचे लक्ष असते. त्यामुळे तुम्ही एफडी केलेले पैसे बुडण्याची शक्यता नसते. याच कारणामुळे कोणतीही जोखीन न पत्करता चांगला परतावा मिळवण्यासाठी एफडी हा चांगला पर्याय आहे.


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) 


हेही वाचा :


पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तीन मोठे आयपीओ, भरघोस नफ्याची नामी संधी


शेअर बाजारात पुन्हा हर्षद मेहतासारखा स्कॅम? मोठ्या उद्योजकाच्या दाव्याने खळबळ !


'या' पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर, गुंतवणूक केल्यास मिळू शकतो चांगला परतावा!