Stock Market Scam: शेअर बाजार (Share Market) हे असे क्षेत्र आहे, जिथे रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या मंचावर एखादी व्यक्ती क्षणात कोट्यधीश होते, तर कधी-कधी क्षणात लोकांचे लाखो रुपये बुडतात. मात्र व्यवस्थित अभ्यास करून शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. दरम्यान, याच शेअर बाजाराविषय खळबळ उडवून देणारा दावा प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी केला आहे. शेअर बाजारात मोठा घोटाळा चालू असून आगामी काळात सामान्य गुंतवणूकदारांना मोठा फटका बसू शकतो, असे गोयंका म्हणाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शेअर बाजार नियामंक संस्था सेबी (SEBI) आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाला यावर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सध्या गुंतवणूकदारांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. 


हर्ष गोयंका यांनी काय दावा केला?


हर्ष गोयंका हे आरपीजी उद्योग समुहाचे अध्यक्ष आहेत. इन्फ्रा, ऑटोमोटीव्ह, आयटी, फार्मा, एनर्जी आदी क्षेत्रात हा उद्योग समूह विस्तारलेला आहे. याच समुहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी समाजमाध्यमावर शेअर बाजारात घोटाळा चालू असल्याचा दावा करणारी एक पोस्ट केली आहे. शेअर बाजारात सध्या मोठा घोटाळा होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केलीय. हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या काळातील घोटाळ्याचे दिवस कोलकात्यात परत आले आहेत. गुजराती-मारवाडी ब्रोकर्सना हाताशी धरून प्रमोटर्स त्यांच्या कंपन्यांच्या स्टॉकचे मूल्य वाढवत आहेत. हे मूल्य वाढवून प्रॉफिट कमवत आहेत, असा दावा हर्ष गोयंका यांनी केलाय. तसेच सेबी आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाने यामध्ये हस्तक्षेप करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 




दोन घोटाळ्यांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठा बदल


भारतीय शेअर बाजारात खळबळ उडवून देणारे दोन घोटाळे भूतकाळात झाले होते. केतन पारेख आणि हर्षद मेहता यांच्या त्यात समावेश होता. या स्कॅममुळे छोट्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला होता. या घोटाळ्यामुळे शेअर बाजाराचा चेहराच बदलला. भविष्यात गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये म्हणून सेबी, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय अर्थमंत्रालयाने शेअर बाजारासंदर्भात अनेक नियमांत बदल केले होते. 


हेही वाचा :


शेतकरी सन्मान निधी योजनेत नाव आहे की नाही, हे कसे शोधावे? जाणून घ्या, नेमकं काय करावं?


काहीही केलं तरी सीबील स्कोअर वाढत नाहीये? मग फक्त 'या' तीन गोष्टी करा!


'या' पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर, गुंतवणूक केल्यास मिळू शकतो चांगला परतावा!