मुंबई : मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असलेली देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी Vodafone Idea ने आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीतील त्यांचे उत्पन्न जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीला 6985.9 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण 12.56 टक्के कमी आहे. 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 7990 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडियाचे उत्पन्न हे 10,673.1 कोटी रुपये होते. तसेच मागील वर्षीच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत VI चे उत्पन्न हे 10,621 रुपये होते. या तिमाहीत कंपनीच्या EBITDA मध्ये थोडीशी सुधारणा झाली असल्याची माहिती देण्यात आलीये. तसेच यावेळी प्रत्येक वापरकर्त्याकडून कंपनीचे उत्पन्न वाढले.
तिसऱ्या तिमाहीत ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) 145 रुपये होता. हा ARPU मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीमध्ये 135 रुपये होता. कंपनीच्या डेटा सब्सक्राइबर्सची संख्या वाढली आहे. डेटा सब्सक्राइबर्सची संख्या 13.53 कोटींवरुन 13.74 कोटी झाली आहे. तर 2022-23 च्या तिमाहीत कंपनीचा कंज्यूमर बेस हा 228.8 दशलक्ष होता, जो या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत घटून 215.2 दशलक्ष झाला आहे.
इतका आहे कर्जाचा भार
Vodafone Idea ने रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये म्हटले आहे की 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत कंपनीवर एकूण कर्ज थकबाकी 214960 कोटी रुपये आहे. स्पेक्ट्रममध्ये 138240 कोटी रुपयांच्या स्थगित स्पेक्ट्रम पेमेंटचा समावेश आहे.AGR लायबिलिटी या 69020 कोटी रुपये आहे, सरकारी बँका आणि वित्तीय संस्थांचे 6050 कोटी रुपये आहेत. कंपनीवर निव्वळ कर्ज थकबाकी 214640 कोटी रुपये आहे.
व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचं चित्र आहे. याचा फायदा रिलायन्स जिओ आणि एअरटेलला होत आहे. निधीच्या कमतरतेमुळे, कंपनी अद्याप 5G सेवा देखील सुरू करू शकली नाही. तर Jio आणि Airtel ने 5G सेवा सुरू केली आहे. आज शेअर बाजार बंद होण्याआधी व्होडाफोन आयडियाचा शेअर 0.68 टक्क्यांच्या वाढीसह 14.60 रुपयांवर बंद झाला.
दरम्यान वोडाफोन आयडीचा युजर्स रेट देखील मागील काही वर्षांपासून वारंवार घटत असल्याचं चित्र आहे. त्यातच आता त्यांचा यंदाच्या तिमाहीत देखील तोटा झालाय. पण त्यांच्या तोट्याची टक्केवारी कमी असल्याने कंपनीला काहीसा दिलासा मिळला असल्याचं सांगण्यात येत आहे.