Kalyan Crime News :  आपल्या विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या पतीला संपवणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पतीला संपवण्यासाठी चार महिने आरोपींनी नियोजन केले असल्याचे तपासात समोर आले आहे. पतीच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह दगड बांधून परिसरातील एका विहिरीत फेकला होता. कल्याण जवळील (Kalyan) आडिवली परिसरात ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 


चंद्रप्रकाश लोवंशी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास करत पत्नी रीता लोवंशी आणि तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा या दोघांनाही बेड्या ठोकल्यात. आपल्या प्रेमातला अडसर दूर करण्यासाठी रिता आणि सुमितने चार महिन्यांपासून प्लॅन आखला होता. कोणाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून रिताने काही दिवसांपूर्वीच चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याचे तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती.  धक्कादायक म्हणजे या कटात सुमितचे दोन अल्पवयीन मित्र  देखील सहभागी आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जानेवारी  रोजी सकाळी 10.20 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व भागातील , आडिवली गावामधील नेताजीनगर येथील  विहिरीमध्ये पाण्यात एका इसमाचा हाताचा पंजा दिसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांनी  अग्निशमन दलाच्या जवानांसह  घटनास्थळी  धाव घेऊन  मृतदेह  पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृत व्यक्तीच्या कमरेला दोरी बांधल्याचे आणि दोरीचे दुसन्या टोकाला बांधलेल्या मोठ्या आकाराचे 80 किलो  दगडासह मृतदेह  पाण्याबाहेर काढला. 


मृतदेहाच्या उजव्या हाताच्या अंगठयावर R आणि उजव्या हातावर CRL असे गोंदलेले दिसुन आले. त्यातच मानपाडा पोलीस ठाण्यात  20 जानेवारी रोजी पासून बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार 21 जानेवारी रोजी दिली असल्याचे पोलिसांना आढळून आले. 


पतीची हत्या नंतर विहिरीत ढकलले


मृत व्यक्तीचा गळा धारदार शस्त्राने चिरला असल्याचे   त्याच्या पाठीवर आणि उजव्या पायाचे गुडघ्यावर जखमा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरुन हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी  मानपाडा पोलीस ठाण्यात  भादंवि कलम 302,201,34 गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.


पोलिसांचा कसून तपास


गुन्ह्यात आरोपीबाबत कोणतीही माहिती नसताना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. वरिष्ठांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. 


पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी रिता चंद्रप्रकाश लोवंशी हिची चौकशी सुरू केली. चौकशीत रिता माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या पद्धतीने तिची चौकशी केली. त्यावेळी आडिवली येथे राहणारा तिचा प्रियकर सुमित विश्वकर्मा याला सर्व माहिती असल्याचे तिने सांगितले. 


त्या अनुषंगाने सुमित विश्वकर्माचा पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर सुमितच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. रिता लोवशी हिचे बरोबर लहानपणापासुन प्रेमसंबंध असून अजूनही प्रेमसंबंध असल्याची कबुली सुमितने पोलिसांना दिली. त्यातून हे कृत्य केल्याचे तपासात  सांगितले.दोघांचाही गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपी  सुमित राजेश विश्वकर्मा आणि  रिता चंद्रप्रकाश लोवंशी यांना अटक केली आहे.


आरोपी सुमितने आपल्या दोन अल्पवयीन मित्रांसह रिताच्या पतीची निर्जनस्थळी हत्या केली.त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकला. मृतदेह पाण्यात फुगून बाहेर येऊ नये यासाठी आरोपींनी प्रयत्न केला. मात्र, मृताचा पाण्याबाहेर आलेल्या एका पंजाने हत्येची घटना उघडकीस आणली आणि आरोपींना गजाआड केले.