कोल्हापूर : नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं देशानं जवळपास ठरवलं आहे, त्यात माझा महाराष्ट्र मागे राहता कामा नये. नरेंद्र मोदींसारखा नेता नाही, देशात नजर फिरवून बघा कोण दुसरा नेता आहे का? असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते आज (29 जानेवारी) कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार स्तुतीसुमने उधळताना सत्ता कशी आवश्यक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सत्तेत आल्यावर टीका केली, वाचाळवीर टीका करत सुटतात, पण आम्ही केवळ विकास विकास विकास हे धोरण ठेवलं. नेत्याला विकासाची दृष्टी असावी लागते तर चांगलं काम होतं असेही ते म्हणाले.
तपास यंत्रणांबाबत एकच गोष्ट सारखी सारखी सांगितल्यावर लोकांना खरं वाटतं
अजित पवार म्हणाले की, तपास यंत्रणाबाबत एकच गोष्ट सारखी सारखी सांगितल्यावर लोकांना खरं वाटतं. आमचं महाविकास आघाडीचे सरकार असताना गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. माहिती मिळाली आणि तपास केला तर गोष्ट वेगळी. आपण आपल्या लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांच्यात देखील चांगलं काम करण्याची धमक असते यावर विश्वास ठेवला पाहिजे, सारखे सारखं म्हणायचं नाही याला जमेल की नाही जमेल की नाही, असेही अजित पवार म्हणाले.
एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस आता संपले
ते पुढे म्हणाले की, एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस आता संपले आहेत. 2019 साली देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढली, तर 25 वर्षाची दोस्ती असलेले भाजप आणि शिवसेना एकत्र लढली. निकाल लागल्यानंतर काय अचानक गोष्टी घडल्या, कुणाच्या मनात काय आलं माहीत नाही. शिवसेना म्हणाली की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाण्याचं ठरवलं आहे. वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या उद्देशाने शिवसेना काढली हे सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत बाळासाहेब हयात होते तोपर्यंत ते त्यांच्या भूमिकेतून पुढे गेले, पण उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्र आल्यानंतर त्यांनी वेगळे निर्णय घेतले. त्यातून 2019 साली महाविकास आघाडी सरकार हे सरकार आलं.
विरोधी आघाडीमध्ये एकमत नाही
त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षात बसलं की तुम्ही विकासकामे करू शकत नाही. सत्ताधारी पक्षाच्या चुका दाखवू शकता. आता विकासाची काम झाली पाहिजे हे सर्व कार्यकर्त्यांचा कल असतो. आपली लोकशाही इतकी मजबूत आहे की आपली जनता कधी कुणाला सत्तेत बसवले आणि कुणाला घरचा रस्ता दाखवेल हे सांगता येत नाही. आज देश पातळीवर मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असं मांडणारा मोठा वर्ग देशात आहे. विरोधी आघाडीमध्ये एकमत नाही. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नितीशकुमार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या