Vijay Mallya : देशातल्या बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. विजय मल्ल्याने (Vijay Mallya) स्थापन केलेली दारू कंपनी आता भारतात जबरदस्त नफा करत आहे. डियाजिओ कंपनीकडे आता विजय मल्ल्याच्या कंपनीचा ताबा असून ही कंपनी आता चांगलीच कमाई करत आहे. 


बँक घोटाळ्यात देश सोडून पळून गेलेला मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या याने आता लंडनमध्ये आश्रय घेतला आहे. भारत सरकार त्याच्याविरुद्ध प्रत्यार्पणाचा खटलाही लढवत आहे, ज्याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. विजय मल्ल्याने युनायटेड स्पिरिट्स ही दारू कंपनी स्थापन केली होती. मात्र आता त्याने ती कंपनी जगातील सर्वात मोठ्या दारू कंपन्यांपैकी एक असलेल्या डियाजिओला (Diageo India) विकली आहे. ही कंपनी भारतात McDowells, Black Dog, Signature, Bagpiper, Antiquity, Johnni Walker आणि Royal Challenge सारख्या ब्रँडची दारू विकते.


दारू विक्रीतून प्रचंड नफा मिळतोय


चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत युनायटेड स्पिरिट्सचा एकत्रित निव्वळ नफा 63.5 टक्क्यांनी वाढून 350.2 कोटी रुपये झाला आहे. तर मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच कालावधीत कंपनीचा नफा 214.2 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचे ऑपरेशनल इन्कम 5.32 टक्क्यांनी वाढून 6,962 कोटी रुपये झाले आहे. तर 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत ते 6,609.80 कोटी रुपये होते.


प्रीमियम दारू विकत घेण्याकडे लोकांचा कल


युनायटेड स्पिरिट्सचे म्हणणे आहे की आता लोकांमध्ये प्रीमियम श्रेणीतील दारूची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत या श्रेणीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि ग्राहकांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे, केवळ विक्रीच वाढली नाही तर कंपनीचा नफाही वाढला आहे.


2023-24 या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या खर्चातही वाढ झाली आहे. या काळात कंपनीचा खर्च हा 3.6 टक्क्यांनी वाढून 6,554.7 कोटी रुपये झाला. तर कंपनीचे एकूण उत्पन्न 5.77 टक्क्यांनी वाढून 7,014 कोटी रुपये झाले आहे.


एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या दारु व्यावसायिकांपैकी एक असलेला विजय मल्ल्या भारतीय बँकांना चुना लावून देश सोडून पळून गेला होता. त्यानंतर त्याचा दारुचा व्यवसाय डियाजिओ इंडिया (Diageo India) या कंपनीने घेतला. हिना नागराजन या कंपनीच्या सीईओ आहेत. 


ही बातमी वाचा: