Suryodaya Yojana : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मंगळवारचा दिवस काळा दिवस ठरला. एकाच दिवसात मुंबई शेअर बाजाराचा (BSE) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1053 अंकांनी घसरून 70,370 अंकांवर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) निफ्टी 333 अंकांनी घसरून 21,238 अंकांवर बंद झाला. त्यामुळे बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 8 लाख कोटी रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. मात्र एकीकडे शेअर बाजारातील सर्व शेअर्स घसरत असताना दुसरीकडे अक्षय ऊर्जा कंपन्यांच्या (Renewable Energy) शेअर्समध्ये मात्र लक्षणीय वाढ दिसून आली. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी जाहीर केलेल्या सूर्योदय योजनेला (Suryoday Yojana) दिलं जात आहे.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतरच्या घोषणेचा परिणाम
सोमवारी अयोध्येतील राममंदिरात (Ram Mandir Pran Pratishtha) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी देशातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. या घोषणेचा उत्साह मंगळवारी शेअर बाजारातही पाहायला मिळाला. शेअर बाजारात प्रचंड घसरण होत असतानाही अक्षय ऊर्जा कंपन्यांचे शेअर्स मात्र वधारताना दिसले.
टाटा पॉवर (Tata Power) आणि इरेडा (IREDA) हे बाजारातील टॉप गेनर्सच्या यादीत सामील झाले. त्यांचे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांनी वाढले. एकूणच अक्षय ऊर्जा कंपन्यांचे समभाग 18 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरू असताना अक्षय उर्जा कंपन्यांना मात्र फायदा झाल्याचं दिसून आलं.
या कंपन्यांना झाला फायदा
मंगळवारी सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या अक्षय ऊर्जा कंपन्यांमध्ये बोरोसिल रिन्युएबल्स (Borosil Renewables) अव्वल ठरली. कंपनीचा शेअर जवळपास 19 टक्क्यांनी वाढला आणि 52 आठवड्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला. टाटा पॉवर दुसऱ्या क्रमांकावर होती. कंपनीचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी वाढले. याशिवाय IREDA, Sterling & Wilson, Vari Renewables, Surana Solar आणि Gensol Engineering कंपन्यांचे शेअर्सही जवळपास 5 टक्क्यांनी वाढले. या सर्व कंपन्यांनी 52 आठवड्यांची सर्वोच्च पातळी गाठली.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे वाढ
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे या क्षेत्रात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. यामुळे सौर पॅनेलची मागणी लक्षणीय वाढेल. पंतप्रधान मोदींनी सोमवारी संध्याकाळी ट्विट केले होते की, अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर मला एक कोटी निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गच्चीवर सौर पॅनेल पाहायचे आहेत. अयोध्येहून परतल्यानंतर त्यांनी घेतलेला हा पहिला निर्णय होता.
ही बातमी वाचा: