Uddhav Thackeray Speech :  नाशिक येथील गोल्फ मैदानात झालेल्या ठाकरे गटाच्या जाहीर सभेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र ओरबडला जात असताना  मिंधे दिल्लीसमोर शेपूट हलवत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी हे गुजरात आणि भारतामध्ये भिंत उभी करत असल्याचे म्हटले.


शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. या अधिवेशनाची सांगता गोल्फ मैदानातील जाहीर सभेने  झाली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. 


उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की,  पंतप्रधान मोदी हे देश आणि गुजरात मध्ये भिंत उभी करत आहेत.भाजपकडून महाराष्ट्र लुटला जात आहे, ओरबडला जातोय. मिंध्ये तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय आणि दिल्ली समोर शेपूट हलवत आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली. 


निवडणुकांमुळे मोदींना महाराष्ट्र आठवत आहे


उद्धव ठाकरे  यांनी पंतप्रधान मोदीवरही हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, मोदींचे दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा म्हणून तिकडे गेले नाहीत. इकडे 48 जागा म्हणून येतात. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे  नुकसान झाले. तेव्हा राज्य सरकारने मागणी करून ही निधी दिला नाही. पण, गुजरातला न मागताही निधी दिला. हिंदूमध्ये विष पेरतात.भेदभाव करतात. देशासाठी 'मन की बात' गुजरातसाठी 'धन की बात' करता अशा शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला. मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत. मोदी हे योग्य नाही, असलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असेही ठाकरे यांनी म्हटले. 


तुमच्या तंगड्या तुमच्या गळ्यात घालणार


उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर तपास यंत्रणांकडून होत असलेल्या कारवाईवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माझ्याकडे कार्यकर्ते पळणारे नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी धाडी घालतात.घर कार्यकर्त्यांचे आणि त्यामध्ये हे अधिकारी तंगड्या पसरून बसतात.आमचे सरकार आल्यावर ह्याच तंगड्या गळ्यात घालणार असल्याचाही हल्लाबोल ठाकरे यांनी केला. भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी आहे. यंत्रणांचा वापर करतात,आमचे संरक्षण काढले हे समोर माझे (शिवसैनिक) सुरक्षा कवच असल्याचे त्यांनी म्हटले.