Federal Reserve Hike Interest Rates: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याज दरात वाढ केली आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हने हा निर्णय घेतला असून व्याज दरात 0.75 टक्के वाढ केली आहे. या निर्णयाचा परिणाम जागतिक शेअर बाजारातही दिसण्याची शक्यता आहे. 


अमेरिकेतील महागाईने मागील 41 वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील महागाईचा दर 9.1 टक्के आहे. महागाई दराचे आकडे समोर आल्यानंतर व्याज दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 0.75 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अमेरिकेतील व्याज दर हा 1994 नंतरचा सर्वाधिक व्याज दर आहे. मागील पतधोरण आढावा बैठकीतही फेडरल रिझर्व्हने 0.75 टक्क्यांची वाढ केली होती.


फेडरल ओपन मार्केट कमिटीने सांगितले की, अमेरिकेत महागाईचा दर वाढला आहे. कोरोना महासाथीचा आजार,  खाद्यान्नांचे वाढलेले दर, महागडी ऊर्जा आदींचा परिणाम व्याज दरांवर दिसून येत आहे. सध्या मागणी आणि पुरवठामध्ये असंतुलन असल्याने महागाई दिसून येत आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की,  अमेरिकन अर्थव्यवस्थेसाठी वाढते व्याज दर हे जोखीम निर्माण करू शकतात. आर्थिक मंदीबाबत फेडरल रिझर्व्हने फारशी चिंता व्यक्त केली नाही.


वर्षात चार वेळेस व्याज दरात वाढ


अमेरिकन फेडरल रिझर्व्हने मागील सव्वा महिन्याच्या कालावधीत व्याज दरात 1.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याशिवाय, या वर्षात चौथ्यांदा व्याज दर वाढ करण्यात आली आहे. 


भारतावर परिणाम?


फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर भारतावरही याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे व्याज दरात वाढ होऊन कर्जे महाग होण्याची शक्यता आहे. तर,  डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमकुवत होण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजारावरही  फेडरल रिझर्व्ह व्याज दराचा परिणाम दिसून येऊ शकतो.