Maharashtra Rains : सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 


मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. 


लातूर पाऊस


लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही भागात तुफान पाऊस झाला या पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. ओढ्यावरील पुलाचा अंदाज न आल्यामुळं दुचाकीस्वार गेल्याची घटना देखील घडली. औसा तालुक्यातील लामजाना, अपचुंदा, जयनगर परिसरात अवघ्या तीस मिनिटात ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडला. या पावसामुळं छोट्या मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांला प्रचंड पाणी आले. 


नागपूर पाऊस


नागपूरमध्येही देखील पाऊस पडत आहे. अनेक भागात  दमदार पावसानं हजेरी लावली. शहरातील काही भागात मेघगर्जनेसह तासभर पाऊस बरसला. पावसाच्या या धुवाधार बॅटिंगमुळे शहरातील रस्ते आणि चौक जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. तासभर मुसळधार बरसल्यावर नंतर पावसाची रिपरिप सुरु होती. जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळं शहरातील एकूणच दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


राज्यात शेती पिकांना मोठा फटका 
 
जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्याला जलमय केले आहे. अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात 8 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.