Sovereign Gold Bond: अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सॉवरेन गोल्ड बॉण्डची 11 वी मालिका आजपासून गुंतवणुकदारांसाठी खुली होणार आहे. ही योजना एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉण्डसाठी आरबीआयच्या वतीनं 10 ग्रॅम सोने म्हणजे एक तोळे सोन्यासाठी 49,120 रुपये इतका भाव ठरवण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या दिवशी लोकांना स्वस्तामध्ये सोने खरेदी करता येणार आहे.
आरबीआयने सॉवरेन गोल्ड बॉण्डची किंमत प्रति ग्रॅम 4,912 रुपये इतकी निर्धारित केली आहे. तर या बॉण्डची ऑनलाईन खरेदी करणाऱ्या गुंतवणुकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना सोने प्रति ग्रॅम 4,862 रुपये म्हणजेच 48,620 रुपये प्रति तोळा इतक्या किंमतीला खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की सॉवरेन गोल्ड बॉण्डची नॉमिनल किंमत ही 4,912 रुपये इतकी निर्धारित करण्यात आली आहे. ही किंमत इंडियन बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशन लिमिडेट (IBJA) द्वारे 27 ते 29 जानेवारी दरम्यान 999 शुद्ध सोन्याच्या सरासरी क्लोजिंग मूल्यावर निर्धारित केली आहे.
या आधी सॉवरेन गोल्ड बॉण्डसाठी इश्यू प्राइस ही 5104 रुपये प्रति ग्रॅम इतकी होती. ती 11 जानेवारी ते 15 जानेवारी या काळासाठी आरबीआयच्या वतीनं खुली करण्यात आली होती.
कुठे खरेदी करायचे गोल्ड बॉण्ड?
सॉवरेन गोल्ड बॉण्ड खरेदी करायचे असतील तर ग्राहकाकडे PAN कार्ड असणं गरजेचं आहे. गोल्ड बॉण्डची खरेदी ऑनलाईन करता येऊ शकेल. त्याचसोबत बॅक, स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडक पोस्ट ऑफिस आणि मुंबई शेअर बाजारामधून या गोल्ड बॉण्डची खरेदी करता येऊ शकेल. या बॉण्डची सेटलमेन्ट डेट ही 9 फेब्रुवारी ही ठरवण्यात आली आहे.
किती प्रमाणात गुंतवणूक करु शकतो?
एका वर्षाच्या काळात गुंतवणुकदार हा जास्तीत जास्त 400 ग्रॅम सोने खरेदी करु शकतो. तर कमीत कमी एक ग्रॅम सोनं खरेदी करता येते. एखादा ट्रस्ट गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त 20 किलो सोन्यामध्ये गुंतवणूक करु शकतो.
याचे फायदे काय?
गोल्ड बॉण्ड हे टॅक्स फ्री असतात. त्याचसोबत यामध्ये एक्सचेन्ज रेशो नसतो. भारत सरकारच्या वतीनं ही विक्री करण्यात येत असल्याने याच्या गुंतवणुकीत कोणताही धोका नाही. तसेच सोने खरेदी करुन ते घरी ठेवण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक केल्यास ती कधीही सुरक्षित असते. महत्वाचं म्हणजे याची विक्रीही सोपी असते आणि यावर कर्जही मिळू शकते.
अर्थव्यवस्था कोरोनाच्या सावटातून बाहेर; सरकारी तिजोरीत पहिल्यांदाच 1.20 लाख कोटी जीएसटी जमा