Indian Railway: भारतात रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. या प्रवासादरम्यान, त्यांच्या आरामासाठी एसी कोचपासून ते इतर सुविधांपर्यंत विविध सुविधा रेल्वे पुरवते. अशातच आता एक अहवाल आला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, असे दिसून आले आहे की, देशात वातानुकूलित डब्याऐवजी रेल्वे प्रवासी जनरल डब्यातून किंवा स्लीपरमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या सात महिन्यांत एकूण रेल्वे प्रवाशांपैकी 95.3 टक्के प्रवाशांनी नॉन-एसी कोचमधून प्रवास केला आहे. फक्त 4.7 टक्के प्रवाशांनी एसी कोच निवडले आहेत.
भारतीय रेल्वेने दिली ही माहिती
भारतीय रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की, यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान देशातील एकूण 390.2 कोटी रेल्वे प्रवाशांपैकी 95.3 टक्के प्रवाशांनी जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये प्रवास केला आहे. केवळ 4.7 टक्के प्रवाशांनी एसी वर्ग (वातानुकूलित) डब्यातून प्रवास केला. रेल्वेच्या वतीने अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वेने गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान सामान्य आणि स्लीपर श्रेणीतील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली आहे.
372 कोटी प्रवाशांनी नॉन-एसी डब्यातून प्रवास केला
यावर्षी, या सात महिन्यांत (एप्रिल ते ऑक्टोबर) एकूण 390.2 कोटी प्रवाशांनी वेगवेगळ्या रेल्वे वर्गांमध्ये प्रवास केला आहे. जो 2022 च्या याच कालावधीतील 349.1 कोटी प्रवाशांपेक्षा 41.1 कोटी अधिक आहे. गेल्या वर्षीच्या शेवटच्या 7 महिन्यांतील एकूण संख्येपेक्षा हे प्रमाण 11.7 टक्के अधिक आहे. रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 390.2 कोटी प्रवाशांपैकी 372 कोटी प्रवाशांनी नॉन-एसी डब्यांमध्ये प्रवास केला तर उर्वरित 18.2 कोटी प्रवाशांनी एसी डब्यांमध्ये प्रवास केला.
95 टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी नॉन-एसी डबे निवडले
एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, एप्रिल ते ऑक्टोबर 2023 दरम्यान रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी 95.3 टक्के प्रवाशांनी जनरल आणि स्लीपर क्लासमधून प्रवास केला. फक्त 4.7 टक्के प्रवाशांनी एसी क्लास निवडला.
कोविड कालावधीच्या तुलनेत आज दररोज 562 अधिक ट्रेन धावतात
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्री-कोविड दिवसांच्या तुलनेत आता दररोज 562 अधिक ट्रेन धावतात. कोविड संकटाच्या काळात दररोज 10,186 ट्रेन धावत होत्या. परंतु आता ती 10,748 पर्यंत वाढली आहे.
दरम्यान, रेल्वेच्या एसी डब्यांचे भाडे जास्त असल्यानं रेल्वे प्रवाशांनी नॉन एसी डब्यातून प्रवास करणे पसंत केले आहे. दुसरे कारण असे असू शकते की भारतीय गाड्यांमध्ये एसी कोचची संख्या कमी आणि जनरल डब्यांची संख्या जास्त आहे. एसी डब्यांची संख्या कमी असल्यानं येथील जागांची संख्याही कमी होते.
महत्त्वाच्या बातम्या: