मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार (Ajit Pawar) गट आग्रही आहे. राष्ट्रवादीकडील चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची घटक पक्षांकडे मागणी केली आहे. अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत. आणखी पाच जागांसाठी महायुतीतील घटक पक्षांकडे मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया, छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे संकेत यांनी दिले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडील चार जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे
संभाव्य उमेदवारांची नावे
- बारामती - सुनेत्रा पवार
- सातारा - रामराजे नाईक निंबाळकर
- रायगड - सुनिल तटकरे
- शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील
- दक्षिण मुंबई - काँग्रेसमधील बडा चेहरा
- परभणी- राजेश विटेकर
- भंडारा गोंदिया - प्रफुल्ल पटेल
- धाराशिव - राणा जगजितसिंह
- छत्रपती संभाजीनगर - सतीश चव्हाण
दरम्यान लोकसभेच्या निवडणुका या कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे अजित पवार गटही आता लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलं असल्याचं पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीवेळी लोकसभेच्या जागेची चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीचा फोटो समोर आला होता.
शिंदे-फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा झाला. ज्या दिवशी शिंदे-फडणवीस अचानक दिल्लीला गेले. त्या दिवसानंतर अजित पवार कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यामुळं अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पालकमंत्रिपदाचं वाटप होण्याआधीही अजित पवार आजारी पडले होते. मंत्रिमंडळ बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती. पण पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ते ठणठणीत बरे होऊन कामालाही लागले होते. आता डेंग्युमुळे आजारी पडल्यावर शंका-कुशंकांना उधाण आले आहे.
हे ही वाचा :
Vinayak Raut : शिंदेंचं विसर्जन, अजित दादांची गळचेपी; विनायक राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल