Top IT Stocks Return: गुंतवणूकदारांना परतावा देण्यात 'या' 5 IT कंपन्या सर्वात पुढे, चार वर्षात दिले 'एवढे' लाख कोटी
भागधारकांना परतावा देण्यात आयटी कंपन्या खूप पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. देशातील पाच महत्वाच्या कंपन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यात पुढे आहेत.
Top IT Stocks Return: शेअर बाजारात (Share Market) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदार अनेक प्रकारे शेअर मार्केटमधून पैसे कमावतात. शेअर्सच्या किंमती वाढण्याव्यतिरिक्त, कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश आणि बायबॅकद्वारे परतावा देतात. या पद्धतींद्वारे भागधारकांना परतावा देण्यात आयटी कंपन्या खूप पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. देशातील पाच महत्वाच्या कंपन्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
गुंतवणूकदारांना सर्वात जास्त परतावा देण्याऱ्या 'या' 5 आयटी कंपन्या
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, टॉप-5 सूचिबद्ध आयटी कंपन्यांनी गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये लाभांश आणि शेअर बायबॅकद्वारे त्यांच्या भागधारकांना 3.28 लाख कोटी रुपये परत केले आहेत. पाच शीर्ष आयटी कंपन्यांना सरासरी पेआउट 79.6 टक्के आहे. शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध असलेल्या पाच बड्या आयटी कंपन्यांध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा आणि एचसीएल टेक या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी, TCS ही सर्वात मोठी कंपनी आहे, जी देशांतर्गत शेअर बाजारातील सर्व कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
प्रथम क्रमांकावर TCS
मिळालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2018-19 ते आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान, TCS ने लाभांश म्हणून भागधारकांना 1,17,087 कोटी रुपये दिले आहेत. या कालावधीत कंपनीने 50 हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी केली आहे. अशा प्रकारे, 94 टक्के पेआउट गुणोत्तरासह भागधारकांना परतावा देण्यात TCS आघाडीवर आहे.
दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिस
गुंतवणूकदारांना परतावा देण्यात इन्फोसिस ही कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे, या कंपनीने गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये 58 हजार 131 कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. तर 26,756 कोटी रुपयांचे शेअर्स पुनर्खरेदी केले आहेत. इन्फोसिसचे पेआउट रेशो 87 टक्के आहे.
तिसऱ्या क्रमांकावर टेक महिंद्रा
गुंतवणूकदारांना परतावा देण्यात टेक महिंद्रा ही कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. ही कंपनी 72.5 टक्के पेआउट रेशोसह तिसऱ्या स्थानावर आहे. या कंपनीने 14,832 कोटी रुपयांचा लाभांश गुंतवणूकदारांना दिला आहे. 1,956 कोटी रुपयांची पुनर्खरेदी केली आहे.
चौथ्या क्रमांकावर HCL
गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये HCL टेकने 30,045 कोटी रुपयांचा लाभांश गुंतवणूकदारांना दिला आहे. तर 4000 कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी केली आहे. कंपनीचे पेआउट रेशो 56.1 टक्के आहे.
विप्रो पाचव्या क्रमांकावर
मागील चार वर्षांच्या कालावधीत विप्रोने 5,393 कोटी रुपयांच्या लाभांशासह 20 हजार कोटी रुपयांच्या शेअर्सची पुनर्खरेदी केली आहे. विप्रोचे पेआउट रेशो 47.8 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या: