मुंबई: एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांची पुन्हा एकदा टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील पाच वर्षांसाठी असल्याचं कंपनीच्या कार्यकारी बोर्डने स्पष्ट केलं आहे. टाटा सन्सच्या कार्यकारी बोर्डाची आज बैठक झाली. त्यामध्ये एन चंद्रशेखरन यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कार्यकालाचा आढावा घेण्यात आला. एन चंद्रशेखरन यांची गेल्या पाच वर्षातील कामगिरी लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. मिठापासून विमानापर्यंत सर्व क्षेत्र व्यापलेल्या टाटा ग्रुप अंतर्गत टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी एन चंद्रशेखरन यांची पुनर्नियुक्ती आल्याने ही त्यांच्या कामाची पोचपावती असल्याचं सांगितलं जातं.


टाटा सन्सच्या आजच्या बैठकीला रतन टाटा यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. रतन टाटा यांनी एन चंद्रशेखरन यांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आणि पुढच्या पाच वर्षांसाठी त्यांना मुदत वाढ देण्यात यावा असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला टाटा सन्सच्या कार्यकारी बोर्डने मंजुरी दिली. 


टाटा सन्सच्या एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी काम करताना आपल्याला समाधान वाटलं आणि पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल आपण संस्थेचं आभार मानतो अशी प्रतिक्रिया एन चंद्रशेखरन यांनी व्यक्त केली. 


चंद्रा या नावाने प्रसिद्ध असलेले एन चंद्रशेखरन यांना 2016 साली टाटा सन्सच्या बोर्डमध्ये सामिल करण्यात आलं होतं. जानेवारी 2017 साली त्यांची नियुक्ती एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी करण्यात आली. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस सारख्या संस्थेंच्या बोर्डचे प्रमुख आहेत. 


सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर एन. चंद्रशेखरन यांना 'टाटा'च्या संचालक मंडळात घेण्यात आले होते. टीसीएसमध्ये 2009 सालापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एन. चंद्रशेखरन यांच्याकडे देण्यात आली. एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळात टाटा सन्सची चांगली प्रगती झाल्याने पुन्हा एकदा त्यांचा कार्यकाल वाढवला असून ती त्यांच्या कामाची पावती असल्याचं सांगण्यात येतंय. 


महत्त्वाच्या बातम्या: