मुंबई: टाटा ग्रुपची एफएमसीजी कंपनी टाटा कन्झुमर्स प्रॉडक्ट्स (Tata Consumer Products) आता प्रसिद्ध हल्दीराम (Haldiram) फूड प्रोडक्ट चेनचे 51 टक्के शेअर्स खरेदी करण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या संबधित वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, टाटा कंझ्युमरची हल्दीराममधील हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. हल्दीरामने त्यांच्या कंपनीचे व्हॅल्युएशन म्हणजे मुल्यांकन हे 10 बिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात 831 अब्ज रुपये इतकं असल्याचं सांगितलं आहे. टाटा कंपनीसोबतच बेन कॅपिटल (Bain Capital) ही खासगी कंपनीदेखील हल्दीरामच्या 10 टक्के शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे.
टाटा समूहाचे कन्झुमर्स युनिट भारतीय स्नॅक फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हल्दीराममधील किमान 51 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. हल्दीरामला 10 अब्ज डॉलर्सच्या मुल्यांकनानुसार हा करार करायचा आहे आणि टाटा समूह या मूल्यांकनासाठी तयार नसल्याचं सांगण्यात येतंय. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हल्दिराम कंपनीने केलेले हे मुल्यांकन टाटा कंपनीला जरा जास्त वाटत आहे.
टाटा आणि हल्दिराम यांच्यातील चर्चा यशस्वी झाली आणि करार झाला तर टाटा समूहाची पेप्सी आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलशी थेट स्पर्धा होऊ शकते.
Haldiram Market In India : देशातील 13 टक्के स्नॅक मार्केट
नमकीन भुजिया आणि मिठाईच्या बाबतीत हल्दीरामचा पदार्थ बहुतांश भारतीय घरात खरेदी केला जातो. हल्दीरामचे देशभरात 150 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत जिथे मिठाई आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. हल्दीरामने देशातील 13 टक्के स्नॅक्स बाजार (India Snack Market) व्यापला आहे. एका अंदाजानुसार, हल्दीरामच्या प्रोडक्टचा स्नॅक्स मार्केटमध्ये हिस्सा सुमारे 6 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 500 अब्ज रुपये इतका आहे. हल्दीरामची भारतासह सिंगापूर, अमेरिकेसारख्या देशांमध्येही चेन आहे.
टाटा कंझ्युमरच्या शेअर्समध्ये वाढ
खाजगी इक्विटी फर्म बेन कॅपिटल (Bain Capital) देखील हल्दीराममधील 10 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. टाटा आणि हल्दीरामच्या या डीलच्या चर्चेची बातमी समोर आल्यानंतर टाटा कन्झुमर्स प्रॉडक्ट्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. टाटा कंझ्युमर 2.37 टक्क्यांच्या वाढीसह 866 रुपयांवर व्यवहार करत आहे. बिकाजी फूड्स सारख्या नमकीन उत्पादक कंपन्या आधीच शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत.
याआधी टाटा समूहाला मिनरल वॉटर कंपनी बिस्लेरी (Bisleri Tata Deal) विकत घ्यायची होती. पण हा करार यशस्वी होऊ शकला नाही.
ही बातमी वाचा:
- Brass City: भारतातील 'या' शहराला म्हणतात पितळ नगरी; अमेरिकेपासून युरोपपर्यंत येथील वस्तूंना मागणी
- Bisleri Tata Deal : आधीपासून पाण्याच्या व्यवसायात असलेले टाटा आता बिस्लेरी का खरेदी करताहेत? 'ही' आहेत प्रमुख कारणे