Swiggy IPO : ह्युंदाई मोटर इंडिया (Hyundai Motor India) या कंपनीच्या आपयीओची देशभरात चर्चा झाली होती. हा आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्ष मात्र गुंतवणूकदारांची चांगलीच निराशा झाली. गेल्या महिन्याभरापासून ह्युंदाई मोटर इंडियाचा शेअर धडपडतोय. ह्युंदाई मोटरच्या आयपीओच्या अशा स्थितीमुळे आता इतरही कंपन्या आपले आयपीओ घेऊन येताना चांगल्याच सतर्क झाल्या आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनेही (Swiggy) आपल्या आयपीओबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 


स्विगीने घेतला मोठा निर्णय


आयपीओसंदर्भात गुंतवणूकदारांची मानसिकता लक्षात घेता स्विगी कंपनीने आपल्या आयपीओचे व्हॅल्यूएशन (मूल्य) कमी साधारण 10-16 टक्क्यांनी कमी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्विगी ही कंपनी नोव्हेंबर 2024 मध्ये आपला आयपीओ घेऊन येण्याची शक्यता आहे. याआधी आयपीओच्या माध्यमातून स्विगी या कंपनीने साधारण 15 अब्ज डॉलर्स डॉलर्स उभे करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता स्विगी कंपनी आयपीओच्या माध्यमातून 12.5-13.5 अब्ज डॉलर्स जमवण्याची शक्यता आहे.


ह्युंदाई मोटरच्या आयपीओची काय स्थिती होती?


गेल्या एका महिन्यात शेअर बाजारात गुंतवणूकदार शेअर्स विकण्याच्या मनस्थितीत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातूनस साधारण 90000 कोटी रुपयांचे शेअर्स विकून टाकले आहेत. असे असताना ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीच्या आयपीओनेही निराशा केली. त्यामुळेच या सर्व परिस्थितीचा विचार करता स्विगीने आयपीओचे मूल्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने आपल्या आयपीओसाठी 1960 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला होता. पण आयपीओ सूचिबद्ध होताना या कंपनीच्या शेअरमध्ये 7.2 टक्क्यांची घसरण झाली. त्या दिवशी सत्राअखेर ह्युंदाई मोटर्स या कंपनीचा शेअर 1820 रुपयांवर बंद झाला.


आयपीओ नेमका कधी येणार?


दरम्यान, रॉयटर्स या वृत्तसंकेतस्थळाच्या माहितीनुसार स्विगी या कंपनीचा शेअर शेअर बाजारावर 13 नोव्हेंबर 2024 रोजी सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. त्याआधी एक आठवडा अगोदर ही कंपनी आपला आयपीओ लॉन्च करण्याची शक्यता आहे. भांडवली नियामक संस्था सेबीने सप्टेंबर 2024 मध्ये स्विगीच्या आयपीओसंदर्भात ऑब्झर्व्हेशन लेटर जारी केले होते. स्विगी इंडियाने एप्रिल 2024 मध्ये आपला आयपीओ घेऊन येण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर जमा केले होते. या ड्रफ्टनुसार स्विगी ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 3750 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू म्हणजेच नवे शेअर्स जारी करण्याची शक्यता आहे.


हेही वाचा :


एका वर्षात सोनं खरेदी करणारे मालामाल! अनेकांच्या तिजोऱ्या पैशांनी भरल्या; यंदाच्या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करावं का?


मोठ्या मनाचा अब्जाधीश! रतन टाटा यांनी लाडक्या कुत्र्यासाठी मृत्यूपत्रात केली मोठी तरतूद; 1000 कोटींच्या संपत्तीचे काय होणार?