Layoff News : IBM या टेक कंपनीत जवळपास चार हजार जणांना नारळ दिल्याची बातमी ताजी असतानाच आता SAP या जर्मन टेक कंपनीमधूनही कर्मचारी कपात होणार असल्याचं समोर आले आहे. गुरुवारी जर्मन कंपनीनं जगभरात तीन हजार कर्मचारी अथवा 2.5 टक्के नोकरकपात केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. क्वाल्ट्रिक्समधील (Qualtrics) उर्वरित हिस्सेदारीची विक्री करण्याचाही कंपनी विचार करत आहे, खर्च कमी करण्यासाठी आणि क्लाउड व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं एसएपी फर्मकडून सांगण्यात आले.  मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, गुगल,  IBM, अॅमेझॉननंतर आता एसएपी या कंपनीमध्येही नोकरकपात करण्यात येणार आहे. 


नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरातील टेक कंपन्यामध्ये नोकरकपातीचा ट्रेंड सुरु झाला आहे. जगभरात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. जगभरात आर्थिक मंदीचं सावट घोंगावत असतानाच टेक कंपन्यामध्ये नोकरकपात सुरु आहे. विविध देशातील अनेक दिग्गज टेक कंपन्यां नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन कंपन्या जागतिक आर्थिक मंदीला सामोरं जात आहेत. त्यामुळं कंपन्या खर्चात कपात करत आहेत.


2023 या आर्थिक वर्षात आम्ही खर्च कमी करण्याचा विचार करत आहोत, जेणेकरुन 2024 मध्ये याचा फायदा होईल. या वर्षात 300 ते 350 दशलक्ष युरोची बचत करण्याचा आमचा मानस आहे, त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे, असे एसएपीचे मुख्य वित्त अधिकारी लुका मुसिक यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. एसएपी फर्मनं आपल्या जर्मनीतील मुख्य कार्यालातून नुकतीच 200 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता ते जगभरात तीन हजार जणांना नोकरीवरुन काढण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, SAP टेक कंपनीच्या क्लाउड बिझनेसच्या चौथ्या तिमाहीत महसुलात 30 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर कंपनीनं नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


तीन कंपन्यातून 40 हजार जणांना नारळ 


या वर्षाच्या सुरुवातीलाच जगातील आघाडीच्या तीन कंपन्यामधून तब्बल 40 हजार जणांना नोकरीवरुन काढून टाकलं. यामध्ये अमेझॉन (Amazon) ने 18,000, माइक्रोसॉफ्ट (Microsoft) ने 10,000 आणि गूगलने 12,000 जणांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. त्याशिवाय इतर अनेक मोठमोठ्या टेक कंपन्यांनी नोकरीवरुन कर्मचाऱ्यांना काढलेय.  


Googles Alphabet Layoffs 2023 : कोणत्या कंपनीत किती कपात?  


ट्विटर
एलन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यापासून साधारण 50 टक्के कर्मचारी कपात केली आहे.


नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्सलाही यंदा आर्थिक फटका बसलाय, कंपनीनं दोन टप्प्यात कर्मचारी कमी केले.


मेटा
फेसबुकची मूळ कंपनी मेटा कंपनी मोठी कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत


अॅमेझॉन
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन 18 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे.  


सिगेट टेक्नॉलॉजिज
हार्ड ड्राईव्ह निर्मितीतल्या महत्वाच्या कंपनीनंही 3000 कर्मचारी कपात करण्यात आली आहे. 


इंटेल
18  हजार कोटींची बचत करण्यासाठी जवळपास 20 टक्के कपातीची शक्यता आहे. 


मायक्रोसॉफ्ट
अपेक्षित उत्पन्न नसल्याने मायक्रोसॉफ्टने 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.  


कॉइनबेस
अमेरिकेतील कॉइनबेस कंपनीने 18 टक्के कर्मचारी कमी केले


स्नॅप
ऑगस्टअखेर कंपनीने 20 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता


शॉपिफाय
ऑनलाईन शॉपिंग कंपनी शॉपिफायनंही 10 टक्के कर्मचारी कपात केली


स्ट्राईप
डिजिटल पेमेंट कंपनी स्ट्राईपनंही 14 टक्के कपातीची तयारी केलीय


ओपनडोअर
रिअल इस्टेटमधील स्टार्टअप कंपनी ओपनडोअरनंही 18 टक्के कर्मचाऱ्यांना काढलं


आणखी वाचा :
IBM News : मोठी बातमी! IBM कंपनीनं तब्बल 3 हजार 900 कर्मचाऱ्यांना दिला नारळ