India vs Japan Hockey World Cup 2023 Live Streaming : हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ ( hockey Team India) आजपासून (26 जानेवारी) वर्गीकरण सामने  खेळणार आहे. वर्गीकरण सामने म्हणजे जे संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यांच्यात आता अधिक चांगलं स्थान मिळविण्यासाठी सामने खेळवले जाणार आहेत. आज नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील विजयी संघ पुढे जाऊन नवव्या ते बाराव्या स्थानासाठी सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर पराभूत संघाला तेराव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळावे लागतील.


आज भारतीय संघ (Team India) वर्गीकरणाच्या सामन्यात उतरणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचा क्रॉसओव्हर सामना गमावल्यानंतर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकला नाही. अशा स्थितीत भारताकडे आता नवव्या ते  सोळाव्या  स्थानासाठी सामना खेळण्याचा पर्याय आहे. भारतीय संघाला येथे सर्वोत्तम म्हणजेच नववे स्थान मिळवायची संधी आहे. त्यासाठी आधी आज भारताला जपानविरुद्ध (India vs Japan) विजय मिळवावा लागेल.


भारतीय संघ जपानपेक्षा बलाढ्य  


जपानचा संघ पूल-बीमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. त्याला बेल्जियम, जर्मनी आणि दक्षिण कोरियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या तुलनेत जपानचा संघ खूपच कमकुवत आहे. अशा स्थितीत आज भारतीय संघ विजयाची नोंद करू शकतो, असे मानले जात आहे. भारतीय संघाने या विश्वचषकात पूल स्टेजवर स्पेन आणि वेल्सचा पराभव केला आणि इंग्लंडसोबत बरोबरी खेळली. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्यात त्याला पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक पराभवाला सामोरे जावे लागले आणि तो विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. 






कधी, कुठे पाहाल सामना?


भारत विरुद्ध जपान हा हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचा सामना गुरुवारी 26 जानेवारी रोजी होणार आहे. राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. भारत विरुद्ध जपान या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  


हे देखील वाचा