Share Market Updates :  देशांतर्गत शेअर बाजाराच्या दीड वर्षाच्या तेजीला आळा बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून Bearish Trend बाजारात वर्चस्व गाजवत आहे. या दरम्यान शेअर बाजाराने सतत झटका देत सुमारे आठ टक्के करेक्शन केले आहे. कोरोनानंतर शेअर बाजाराकडे वेगाने धाव घेणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांच्या हाती सर्वाधिक निराशा आली असल्याचे म्हटले जात आहे. 


किरकोळ गुंतवणुकदारांची निराशा 


शेअर बाजारात तेजी (Bull Trend) मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झाली.  कोरोना महासाथीचा मोठा दबाव अर्थव्यवस्थेवर होता त्यावेळी शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. शेअर बाजारातील ही घोडदौड ऑक्टोबर महिन्यापर्यंत कायम राहिली. या दरम्यान बाजाराने आपला आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर शेअर बाजार दर आठवड्यात घसरणीसह बंद होऊ लागला होता. त्यामुळे बाजारत तेजीत असताना नफा कमावणारे किरकोळ गुतंवणूकदारांना फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. 


बाजारातील तेजीने दिला किरकोळ गुंतवणुकदारांना चांगला परतावा 


तीन एप्रिल 2020 रोजी निफ्टी 8083.80 या अंकावर होता. या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी 18477.05 या अंकावर बंद झाला. या दरम्यानच्या काळात निफ्टीने 18604.45 या आतापर्यंतच्या उच्चांकाची नोंद केली. जवळपास दीड वर्षातील तेजीत गुंतवणूकदारांना सुमारे 130 टक्क्यांचा परतावा मिळाला. बाजारातून मिळणाऱ्या एवढ्या परताव्यामुळे किरकोळ गुंतवणुकदार शेअर बाजाराकडे आणखी आकर्षित झाले. 


दर महिन्याला 27 लाख डिमॅट अकाउंट


सध्याच्या आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस डिमॅट अकाउंटधारकांची संख्या 7.38 कोटी इतकी झाली. तर, मागील आर्थिक वर्षात डिमॅट अकाउंटची संख्या 5.51 कोटी इतकी होती. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यातच विक्रमी 1.87 कोटी डिमॅट अकाउंट सुरू करण्यात आले. याचाच अर्थ दर महिन्याला सरासरी 26.71 लाख नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यात आली. 


या कारणांमुळे बाजारात घसरण 


ऑक्टोबरनंतर सुरू झालेल्या घसरणीचा कालावधी पाहिला तर बाजार सुमारे आठ टक्क्यांनी घसरला आहे. ओमायक्रॉनचा धोका, व्याजदर वाढवण्याच्या मार्गावर असणारी केंद्रीय बँक, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून होणारी विक्री, मोठ्या गुंतवणुकदारांकडून होत असलेली नफावसुली यामुळे बाजारात घट दिसून येत आहे. सध्या आणखी काही काळ शेअर बाजारात घसरण दिसून येण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्याही अभ्यासाशिवाय बाजारात उतरणाऱ्या किरकोळ गुंतवणुकदारांना मोठा फटका बसत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.