Share Market Updates : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्सनं 330 अंकांची झेप घेतली आहे तर निफ्टी 90 अंकांनी वधारला आहे. जागतिक बाजारातील शेअर बाजार वधारल्यानं भारतीय बाजारात तेजी आल्याचं चित्र आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा तेजी आली आहे. तेलाच्या किंमती 107 डाॅलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. डाॅलरच्या तुलनेत रुपयात 8 पैशांची वृद्धी झाली आहे. रुपया 76.53 वर उघडला आहे.  मेटल, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात तेजी आली आहे. ओएनजीसी, सन फार्मा, टाटा स्टीलसारख्या कंपन्यांचे समभाग वधारले आहेत. 


 आज अशी झाली बाजारात ओपनिंग


आज एनएसईच्या निफ्टीमध्ये 84.20 अंक म्हणजे 0.49 टक्क्यांच्या तेजीसह 17,329.25 वरुन ट्रेडिंगची सुरुवात झाली आणि बीएसईचा सेंसेक्स 296.45 अंक म्हणजे 0.52 टक्क्यांच्या उसळणीसह 57,817.51 वर सुरु झाला.


निफ्टीचं काय?
आज बाजाराची सुरुवात आठवड्याच्या सुरुवातीला चांगली झाली आहे. यामुळं निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्समध्ये तेजीसह मार्केट सुरु आहे तर अन्य 11 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे.  


काल गुरुवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 701 अंकांनी घसरला होता तर निफ्टीही 206 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 1.23 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,521 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 1.21 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,245 वर पोहोचला होता. काल 1594 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती तर 1729 शेअर्समध्ये घसरण झाली होती. 104 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. कालचा बाजार बंद होताना ऑटो, एफएमजीसी, कॅपिटल गुड्स या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळं आज बाजार बंद होताना आठवड्याचा शेवट कसा होईल याकडे लक्ष लागून आहे.