LIC IPO News : एलआयसी आयपीओबाबत बुधवारी अधिकृतपणे माहिती देण्यात आली. एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी खुला होणार आहे. एलआयसी पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतही देण्यात आली आहे. 9 मेपर्यंत गुंतवणुकदारांना आयपीओसाठी अर्ज करावे लागणार आहे. एलआयसी कर्मचारी आणि पॉलिसीधारकांसाठी आयपीओच्या दरात विशेष सवलत देण्यात आली आहे. 


एलआयसी आयपीओत इतकी सवलत 


एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर प्रति समभाग 60 रुपये किंवा 6 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, कर्मचारी, रिटेल गुंतवणूकदारांना प्रति समभाग जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे.  


पॉलिसी लॅप्स झाली असली तरी सवलत


तुमच्याकडे असलेली एलआयसीची एखादी पॉलिसी काही कारणास्तव लॅप्स झाली असली तरी तुम्हाला आयपीओमधील विशेष सवलतीचा लाभ मिळणार आहे. पॉलिसी लॅप्स झाली असेल तरीदेखील आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, एखादी पॉलिसी मॅच्युअर झाली नसेल अथवा तिला सरेंडर केलं नसेल अथवा विमाधारकाचा मृत्यू झाला नसेल तर पॉलिसीधारकाला आयपीओमधील विशेष सवलतीचा फायदा मिळणार आहे. 


मुलांच्या पॉलिसीवरही फायदा


लहान मुलांच्या नावावर पॉलिसी असली तरी आयपीओच्या सवलतीचा फायदा घेता येऊ शकतो. एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या विमा पॉलिसीवर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी करणाऱ्याला पॉलिसीधारक समजले जाते. त्यामुळे लहान मुलांच्या एलआयसी पॉलिसीवर मुलांच्या वडिलांनी अथवा आई यांपैकी ज्यांनी स्वाक्षरी केली असेल त्यांना आयपीओतील आरक्षण आणि सवलतीच्या दराचा फायदा घेता येऊ शकतो. 


संयुक्त पॉलिसीवर एकालाच फायदा 


पती-पत्नीच्या नावाने एलआयसीची संयु्क्त विमा पॉलिसी असेल तर दोघांपैकी एकचजण Policyholder Reservation Portion अर्ज करू शकतो. दुसरी व्यक्ती रिटेल कॅटेगरीतून अर्ज करू शकतात. संयुक्त पॉलिसी असलेल्यापैकी एकालाच एलआयसी आयपीओच्या सवलतीचा फायदा मिळू शकतो. 


ग्रुप एलआयसी पॉलिसी असल्यास फायदा नाही 


जर तुमच्याकडे एलआयसीची कोणतीही ग्रुप पॉलिसी असल्यास तुम्हाला आयपीओमध्ये आरक्षण अथवा सवलतीचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे आयपीओसाठी तुम्हाला वैयक्तिक पॉलिसी हवी. 


या पॉलिसीधारकांना सवलतीचा फायदा नाही 


पॉलिसीधारकांना आयपीओमधील सवलतीचा फायदा मिळवण्यासाठी भारतीय नागरिकता आवश्यक आहे. पॉलिसीधारक अनिवासी भारतीयांना आयपीओतील आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.