Insurance Share Update: भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या लिस्टिंगची जोरदार चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे मागील सहा महिन्यात विमा क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर दरात जवळपास 30 टक्क्यांची घसरण झाली असल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांत शेअर बाजारात घसरण सुरू आहे. त्याचा फटकाही विमा क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. त्यातच आता मंगळवारी एलआयसीची बाजारात लिस्टिंग होणार आहे. त्यामुळे एलआयसीच्या लिस्टींगकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर काही ब्रोकरेज संस्थांनी विमा क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर खरेदी करण्याचे संकेत दिले आहे. Emkay Globalने काही शेअर वधारणार असल्याचे संकेत दिले आहेत. एचडीएफसी लाइफ याचा शेअर दर सध्या 562 रुपये आहे. हा शेअर 690 रुपयाचा स्तर गाठू शकतो. तर, ICICI प्रुडेंशिअल लाइफचा सध्याचा दर हा 503 रुपये आहे. टार्गेट प्राइस 660 रुपये देण्यात आला आहे. एसबीआय लाइफचा शेअर दर सध्या 1068 रुपये आहे. टार्गेट प्राइस 1645 रुपये वर्तवण्यात आला आहे.
Emkay Global नुसार, एसबीआय लाइफचा शेअर दर चांगलाच वधारण्याची शक्यता आहे. विमा क्षेत्रातील काही कंपन्यांचे शेअर्स हे 52 आठवड्यातील उच्चांकी दरापासूनच्या 30 टक्के सवलतीत मिळत आहेत. व्याज दरातील वाढ झाल्याचा फायदा विमा कंपन्यांना होऊ शकतो असेही ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. विमा क्षेत्रातील एलआयसीची मक्तेदारी खासगी विमा कंपन्या मोडून काढू शकतात, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मागील काही वर्षात एलआयसीचा विमा बाजारपेठेतला हिस्सा कमी झाला आहे.
एलआयसीची 17 मे रोजी लिस्टींग
एलआयसीचा 17 मे रोजी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. एलआयसीच्या आयपीओचे वाटप झाले आहे. ग्रे मार्केटमध्ये एलआयसीचा प्रीमियम दर कमी झाल्याने गुंतवणुकदारांच्या मनात धाकधूक वाढली आहे. त्यामुळे आता कोणत्या दरावर एलआयसीची लिस्टींग होणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.