Congress News : काँग्रेस पक्षाचं शिबिर (Congress Nav Sankalp Chintan Shivir) कालपासून सुरु झालं आहे. उदयपूरमध्ये तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. या तीन दिवसीय शिबिरात अनेक महत्वाचे निर्णय होणार आहेत. यात एक सर्वात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमध्ये आता एका नेत्याला जास्तीत जास्त राज्यसभेच्या दोनच टर्म मिळणार असाही नियम बनण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर एका नेत्याला दोनच वेळा संधी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 


'एक कुटुंब-एक तिकीट' याची बाहेरच चर्चा, अद्याप निर्णय झालेला नाही - काँग्रेस नेते अशोक चव्हाण 


'एक कुटुंब एक तिकीट' असा निर्णय झाल्याची माहिती समोर आली होती. यावर बोलताना काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, 'एक कुटुंब एक तिकीट' याची बाहेरच चर्चा, अद्याप निर्णय झालेला नाही. सध्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये चाळीस लोक एकत्रित बसून चर्चा करत आहेत त्यातून काही गोष्टी समोर येत आहेत. एक कुटुंब एक तिकीट असावं की नसावं याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार नाही. पण भाजपच्या अजेंडानुसार आम्ही प्रतिक्रिया देत राहणं योग्य नाही. अध्यक्षपदाचा विषयही मार्गे लागेलच. उदयपूर मधलं हे चिंतन काँग्रेस पक्षाला योग्य दिशेने पुढे घेऊन जाईल, असंही चव्हाण म्हणाले. औरंगजेबाच्या समाधीवर एमआयएम नेते पोहोचल्याच्या घटनेवर त्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, देशाचा इतिहास जो आहे तो आहे त्यात बदल करण्याची उदात्तीकरण करण्याची गरज नाही. त्यावर राजकारण करण्याची गरज नाही. लोकांचे प्रश्‍न वेगळे आहेत, असं चव्हाण म्हणाले. 


नवसंकल्प शिबिरातल्या काँग्रेसच्या काही घोषणा:


1.एक व्यक्ती एका पदावर जास्तीत जास्त पाच वर्षे राहू शकणार


2.एक परिवार एक तिकीट, परिवारातल्या सदस्याला तिकीट हवं असेल तर किमान पाच वर्ष संघटनेत काम आवश्यक


3.संघटनेत सर्व कमिट्यांवर 50% युवा असलेच पाहिजेत (35 ते 50 वयोगटातील अधिक)


शिबिरामध्ये कमालीची गोपनीयता


काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरामध्ये देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत. मात्र या शिबिरामध्ये कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या शिबिरात विविध समित्यांच्या बैठका पार पडणार आहेत. या समित्यांच्या बैठकांवेळी प्रत्येकाला आपापले मोबाईल बाहेर लॉकअपमध्ये ठेवून जायला सांगण्यात आलं आहे. राजकीय, सामाजिक न्याय आणि विकास, अर्थव्यवस्था, संघटन, शेतकरी आणि कृषी, तरुण आणि रोजगार या सहा विषयावर यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील काँग्रेस नेत्यांची कमिटीही तयार करण्यात आलेली आहे. या कमिट्यांच्या बैठका शिबिरात होणार आहेत. या बैठकांमधून गोपनीय माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.


इतर संबंधित बातम्या


Congress : काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा सुटणार? कायम सक्रिय असणाऱ्या नेत्याकडे अध्यक्षपद द्या; चिंतन शिबिरात नेत्यांची मागणी


Sonia Gandhi : देशात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे, लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा : सोनिया गांधी 


Congress : काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात कमालीची सावधगिरी; बैठकीला जाताना मोबाईल लॉकअपमध्ये!


Congress : काँग्रेसचा 'एक परिवार, एक तिकीट' फॉर्म्युला, पण...