Stock Market Closing मुंबई: भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरणीचं सत्र पाहायला मिळालं. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातील समभागांची विक्री आणि अमेरिकेतील बाजारातील घसरणीच्या संकेतामुळं शेअर बाजारावर परिणाम होत आहे. भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांचं मूल्य कमी होत असून घसरणीचं सत्र कायम आहे. आज बँकिंग, ऑटो, मेटल, फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. घसरणीच्या नव्या रेकॉर्डची देखील नोंद झाली. विशेष बाब म्हणजे गुंतवणूकदारांचे दोन दिवसांमध्ये 12 लाख कोटी बुडाले.
बाजार बंद झाला तेव्हा काय स्थिती होती?
शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स 984.23 अंकांनी म्हणजेच 1.25 टक्क्यांनी घसरुन 77,690.95 च्या पातळीवर बंद झाला. तर, दुसरीकडे एनएसईव निफ्टी 324.40 अंकांनी म्हणजेच 1.36 टक्क्यांनी घसरुन 23,559.05 वर बंद झाला. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
गुंतवणूकदारांचं दोन दिवसात 12 लाख कोटींचं नुकसान
बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 430.45 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. काल बाजार बंद झाला तेव्हा ते 436.59 लाख कोटी रुपयांवर होतं. म्हणजेच गुंतवणूकारांना लावलेल्या एकूण रकमेपैकी 6.14 लाख कोटी रुपये आज बुडाले. म्हणजेच दोन दिवसात गुंतवणूकदारांचे एकूण 12 लाख कोटी रुपये बुडाले आहे.
कोणत्या क्षेत्रात घसरण
रियल्टी सेक्टरमध्ये 3.17 टक्के घसरण झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरमध्ये 3.08 टक्के घसरण पाहायला मिळाली. स्टील क्षेत्रात 2.66 टक्के,ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये 2.17 टक्के घसरण पाहायला मिळाली. याशिवाय बँक निफ्टीमध्ये 2.09 टक्के घसरण झाली असून हेल्थकेअर क्षेत्रात 2.10 टक्के घसरण पाहायला मिळाली.
आजच्या दिवसांमध्ये एकूण 2300 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बीएसई आणि एनएसईवर असलेल्या घसरण असलेल्या शेअरची संख्या अधिक होती. बँक निफ्टी बाजार बंद होईपर्यंत 50100 वर होती आज त्याची घसरण 50000 पर्यंत झाली होती. मार्केट बंद होईपर्यंत बाजारात थोडी सुधारणा झाली होती. मात्र, आजच्या दिवसात बँक निफ्टी 1069 अंकांच्या घसरणीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं. बाजारात घसरण होत असल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे.
इतर बातम्या:
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)