बीड : जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात महत्वाची आणि राज्यभरात उत्सकता लागलेल लढत म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, एकेकाळी राजकीय वैर असणारे मुंडे बहिण भाऊ महायुतीच्या माध्यमातून यंदा पुन्हा एकदा एकत्र आल्याच्या बघायला मिळाले आहे. ज्या घडाळ्यने मुंडे बहीण भावांना वेगळे केले होते, त्याच घड्याळाने या दोघांनाही आता एकत्र आणले आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) प्रचार केला. मात्र, जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक परिस्थिती बदलल्याने पंकजा मुंडेंना 6,500 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांना मोठं मताधिक्य होतं. आता, याच परळी विधानसभा मतदारसंघात धनुभाऊसाठी पंकजा मुंडे मतं मागत आहेत. 


परळी मतदारसंघात महायुतीकडून धनंजय मुंडे उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे साहेबराव देशमुख मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी साहेबराव देशमुख यांच्यासाठी जाहीर सभा घेत धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. तसेच, या मतदारसंघात तुमचा हक्काचा माणूस विधानसभेत पाठवायचा आहे, असे म्हणत शरद पवारांनी साहेबराव देशमुख यांच्या पाठीशी परळीकरांनी उभे राहावे असे आवाहनही केले. कारण, राष्ट्रवादीतील फुटीनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजितत पवारांसोबत सत्तेत सहभाग घेतला आहे. तर, प्रचारसभा आणि मुलाखतीतून ते शरद पवारांवर टीकाही करत आहेत. त्यामुळे, शरद पवारांनी येथील खासदार बजरंग सोनवणेंनाही धनंजय मुंडेंच्याविरुद्ध प्रचाराच्या मैदानात उतरवल्याचं पाहायला मिळालं. 


2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणाला लीड  


बीड लोकसभा निवडणुकीतील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि बदललेली राजकीय व सामाजिक समीकरणे यांच्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात यंदाची लोकसभा निवडणूक जातीय समीकरणावर ठरली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांनी 6,550  मतांनी विजय मिळवली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाला. मात्र, परळी विधानसभा मतदारसंघात त्यांना मताधिक्य मिळालं आहे. पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात तब्बल 74 हजारांचा लीड मिळाला आहे. याशिवाय आष्टी मतदारसंघातून 32 हजारांचे मताधिक्य आहे. तर, माजलगाव मतदारसंघात अवघ्या 935 मतांचे मताधिक्य पंकजा मुंडेंना आहे. 


परळी मतदारसंघात 2019 साली काय झालं


परळी विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपा युतीकडून पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या धनंजय मुंडे यांच्यात थेट लढत झाली होती. राज्याचं लक्ष लागलेल्या बहिण-भावांच्या या लढतीत भावाने बाजी मारल्याने पंकजा मुंडेंना पराभव पत्कारावा लागला. मात्र, यंदा राजकीय समीकरणे बदलल्यानंतर पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आल्याने धनंजय मुंडेंना येथून महायुतीची उमेदवारी मिळाली आहे. गत, 2019 च्या विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजा यांचा 30,701 मतांनी पराभव केला होता. धनंजय मुंडेंना 1 लाख 22 हजार 114 मतं मिळाली होती. तर, पंकजा मुंडेंना 91 हजार 413 मतं पडली होती. तर, वंचित बहुजन आघाडीच्या भीमराव सातपुते यांना 4,713 मतं मिळाली होती. 


हेही वाचा


20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं