मुंबई: आजचा शुक्रवार बाजारासाठी 'ब्लॅक फ्रायडे' ठरला. अमेरिकेतील वाढत्या महागाईचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर पहायला मिळाला. सेन्सेक्स एका वेळी जवळपास एक हजार अंकांनी तर निफ्टी 300 हून अधिक अंकांनी खाली गेला होता. शुक्रवारी शेअर बाजार बंद होतानादेखील मोठी पडझड झाल्याचं दिसून आलं. 


गेल्या दोन वर्षांचा कालावधी हा अमेरिकेसोबतच जगासाठी मोठा कठीण कालावधी होता. अशातच कोरोना महामारीतून जात असताना अनेक बड्या अर्थव्यवस्थांना त्याचा धक्का बसल्याचं दिसून आलं. अमेरिकादेखील त्याला अपवाद नाही. गुरूवारी आलेल्या आकडेवारीनुसार अमेरीकेतील महागाई दर हा गेल्या 40 वर्षातला उच्चांकी पातळीवर आहे आणि त्याचाच परिणाम अमेरिकेतील शेअर बाजारांवर दिसला. अमेरिकेतील सर्व प्रमुख एक्सचेंजमध्ये घसरण झाल्याचं पहायला मिळालं. 


सन 1982 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेत मोठी महागाई पाहायला मिळतेय. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही मोठी घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय. डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरलाय. 23 डिसेंबर 2021 नंतर रुपयाची किंमत पहिल्यांदाच नीच्चांकी पातळीवर आली आहे.


अमेरीकेतील महागाई दर वाढल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावर देखील दिसला. शुक्रवारी बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं तर निफ्टी देखील 150 अंकांनी खाली होता. गेल्या अनेक दिवसांपासून जागतिक बाजारातील पडझडीमुळे भारतीय बाजारात देखील अस्थिरता बघायला मिळत आहे.


आयटी, रिॲलिटी आणि वित्त क्षेत्रात मोठी पडझड झाली. दुसरीकडे, आयटी क्षेत्रातील स्टॉक्समध्ये सतत होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चिंतेत सापडले आहेत. बॅंकिंग क्षेत्रानं देखील गुंतवणूकदारांची आज निराशा केली. डॉलरच्या तुलनेत रुपयादेखील पंच्चात्तरी पार गेल्याचं दिसून आलं. भू-राजकीय परिस्थितीमुळे देखील बाजारावर गेल्या अनेक दिवसांपासून परिणाम होताना दिसतोय. आणि यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती देखील वाढताना दिसत आहेत. 


अमेरिकेच्या फेडरल बॅंकेकडून व्याजदरात मार्च महिन्यात वाढ करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम म्हणून अमेरीकेतील महागाई नियंत्रणात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, अमेरिकन डॉलर देखील मजबूत होईल. मात्र, याचा मोठा परिणाम रुपयावर झालेला दिसेल. अशात आरबीआयकडून पाऊलं टाकणं गरजेचं असेल.


जगभरातील बाजारात जर निराशा दिसली तर त्याचा फटका हा त्या-त्या देशातील शेअर बाजारांना अंशत: बसत असतो. अमेरिकेने व्याज दरवाढीबाबत घेतलेला निर्णय हा महागाई रोखण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. मात्र, भारतावर याचा दूरगामी परिणाम दिसणार नाही असं देखील अनेक तज्ज्ञांचं मत आहे. 


संबंधित बातम्या: