(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सने गाठला 60 हजारांचा टप्पा
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत मिळत आहेत. सेन्सेक्सने पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा गाठला
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही तेजीचे संकेत दिसत आहेत. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) खरेदीचा जोर दिसून येत आहे. आज बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टीने 40500 अंकांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सने (Sensex) बाजार सुरू होताच 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. त्यानंतर काहीशी घसरण झाली.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स 357.53 अंकांनी वधारत 60,045 अंकांवर खुला झाला. एनएसईचा निफ्टी 124.60 अंकांनी वधारत 17,923 अंकांवर खुला झाला. सकाळी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर निर्देशांकात विक्रीमुळे घसरण झाली. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 260 अंकांच्या तेजीसह 59,948.78 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 91 अंकांच्या तेजीसह 17,890.10 अंकांवर व्यवहार करत होता.
बाजारातील व्यवहार सुरू होताच सेन्सेक्सने 60100 अंकांचा टप्पा ओलांडला. मात्र, काही वेळेतच सेन्सेक्स निर्देशांक 60 हजार अंकांच्या खाली आला. तर, निफ्टीने 17,925 अंकांची पातळी ओलांडली होती. काही वेळेनंतर त्यात घसरण झाली.
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी पॉवरग्रीड आणि एनटीपीसी या दोन कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. तर, निफ्टीमधील 50 कंपन्यांपैकी 46 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, चार कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली.
भारती एअरटेल, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी आणि कोटक महिंद्रा बँकेतील शेअर्स तेजीत आहेत. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, टायटन, आयटीसी, मारूती, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एल अॅण्ड टी, विप्रो, टाटा स्टील, एसबीआय बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, इन्फोसिसच्या शेअर दरात वाढ झाली आहे.
प्री-ओपनिंगमधील सत्रात शेअर दरात निफ्टीमध्ये 137 अंकांची तेजी दिसून आली. तर सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला होता.
गुरुवारी शेअर बाजारात तेजी
गुरुवारी, भारतीय शेअर बाजारात (Share Market) चांगली तेजी दिसून आली. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील (Banking And IT Sector )स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजारात तेजी दिसली. आज शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 659 अंकांनी वधारून 59,688 अंकावर बंद झाला. तर, एनएसईचा निर्देशांक निफ्टीमध्ये 174 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी निर्देशांक 17,798 अंकांवर बंद झाला.