(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात, पण अस्थिरतेचे सावट
Share Market Opening : शेअर बाजारात सकारात्मक सुरुवात झाली असली तरी बाजारातील व्यवहारांवर अस्थिरतेचे सावट आहे.
Share Market Opening : शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात (Share Market Opening Bell) झाली असली तरी बाजारावर अस्थिरतेचे सावट आहे. बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्स (Sensex) 100 अंकांनी वधारत खुला झाला. तर, निफ्टीने (Nifty) 17300 अंकांची पातळी ओलांडली. मात्र, काही वेळेनंतर बाजारात विक्रीचा दबाव दिसू लागल्याने घसरण सुरू झाली.
एनएसईचा निफ्टी निर्देशांक 37.45 अंकांच्या तेजीसह 17,349.25 अंकांवर खुला झाला. तर, सेन्सेक्स 107.11 अंकांनी वधारून 58,174.11 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 182 अंकांच्या घसरणीसह 57,954.21 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 73.45 अंकांची घसरण दिसत असून 17,272.00 अंकावर व्यवहार करत आहे.
आज सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 17329 च्या पातळीवर व्यवहार करत होता. निफ्टी 50 पैकी 22 शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. तर, 28 शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. बँक निफ्टीमध्ये 123 अंकांची घसरण दिसून आली. बँक निफ्टी 37900 च्या पातळीवर व्यवहार करत होता.
आज, आयटी, मेटल फार्मा, हेल्थकेअर क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. तर, ऑटो क्षेत्रात घसरण झाली आहे. त्याशिवाय, कोल इंडियाच्या शेअर दरात 2.16 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रामध्ये 1.39 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 1.11 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. एनटीपीसी, ओएनजीसी, हिंदाल्को आणि नेस्लेच्या शेअर दरातही घसरण दिसून येत आहे.
मंगळवारी बाजार वधारला
मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा, सेन्सेक्समध्ये 20 अंकांनी वधारला. तर, निफ्टी निर्देशांक 5.50 अंकांनी वधारला. सेन्सेक्समध्ये 0.04 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,136 अंकांवर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,345 अंकावर स्थिरावला. मंगळवारी शेअर बाजार बंद होताना 1829 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1460 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. 122 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.