Share Market News: मागील काही दिवसांपासून घसरण दिसून येत असलेल्या शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसून येत आहेत. प्री-ओपनिंग सत्रात घसरण झाली होती. त्यानंतर बाजारातील नियमित व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ( BSE Sensex)पुन्हा एकदा 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. सरत्या वर्षातील हा शेवटचा आठवडा असल्याने बाजारातील व्यवहाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. 


आज, शेअर बाजारातील व्यवहार सुरू होताच, सेन्सेक्स निर्देशांक 90.21 अंकाच्या घसरणीसह  59,755.08 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक (NSE Nifty) 23.6 अंकांनी वधारत  17,830.40  अंकांवर खुला झाला. त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने तेजी दिसून आली. सकाळी 9.42 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स (Sensex) 447 अंकांच्या तेजीसह 60,292.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक (Nifty 50) 133 अंकांच्या तेजीसह 17,939.80 अंकांवर व्यवहार करत होता. 


निफ्टी निर्देशाकांतील अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 2.69 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.28 टक्क्यांची तेजी आहे. टाटा मोटर्समध्ये 1.89 टक्के, कोल इंडियाच्या शेअर दरात 1.81 टक्के, अदानी पोर्टसच्या शेअर दरात 1.81 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअर दरात 1.11 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. सिप्लाच्या शेअर दरात 0.71 टक्के, सन फार्माच्या शेअर दरात 0.62 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. 


बँक निफ्टीतही (Bank Nifty) तेजी दिसून येत आहे. बँक निफ्टी निर्देशांक 41,716.35 अंकांवर खुला झाला. त्यानंतर 42,153.40 अंकांचा उच्चांक गाठला. बँक निफ्टी 458 अंकांच्या तेजीसह 42,126.20 अंकांवर व्यवहार करत आहे. बँक निफ्टी निर्देशांकातील 12 ही बँकिंग शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. 


'शेअर इंडिया' फर्मचे उपाध्यक्ष, संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, शेअर बाजारातील व्यवहार आज 17600-17900  दरम्यान व्यवहार करू शकतात. फार्मा, वित्तीय सेवा, एफएमसीजी, बँक आणि आयटी सेक्टर्समध्ये तेजी दिसून येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. बँक निफ्टीत आज चढ-उतार दिसून येऊ शकतात. 


प्री-ओपनिंगमध्ये घसरण


शेअर बाजारातील प्री-ओपनिंग सत्रात संमिश्र चित्र दिसून आले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 16.365 अंकांनी वधारत 17823.15 अंकांवर व्यवहार करत होता. तर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 80.47 अंकांच्या घसरणीसह  59764.82 अंकांच्या पातळीवर होता.