(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sensex Closing Bell : इस्रायल-हमासच्या युद्धात गुंतवणूकदार होरपळले; चार लाख कोटींचा चुराडा
Share Market Closing Bell : युद्धाची चिंता आणि कच्चे तेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती यामुळे जागतिक बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारात आज घसरण दिसून आली.
मुंबई : इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरू ( Israel Hamas War) असलेल्या युद्धात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार चांगलेच होरपळले आहेत. बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. युद्धाची चिंता आणि कच्चे तेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती यामुळे जागतिक बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारात आज घसरण दिसून आली.
आज बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (BSE Sensex) 483 अंकांच्या घसरणीसह 65,512 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 141 अंकांच्या घसरणीसह 19,512 अंकांवर बंद झाला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी फक्त 3 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 7 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार?
आजच्या व्यवहारात शेअर बाजारातील सर्वच सेक्टरमधील शेअर्समध्ये घट झाली आहे. सकाळच्या वेळी तेजीत असणाऱ्या आयटी सेक्टरमध्येही घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस, एनर्जी, ऑटो, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, मीडिया, मेटल सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही मोठी घसरण दिसून आली आहे. निफ्टी मिड कॅप 1.34 टक्क्यांच्या घसरणीसह 39,744 अंकांवर आणि स्मॉल कॅप निर्देशांक 1.78 टक्क्यांच्या घसरणीसह 12,609 अंकांवर बंद झाला.
इंडेक्स | किती अंकांवर स्थिरावला | दिवसभरातील उच्चांक | दिवसभरातील नीचांक | किती टक्के बदल |
BSE Sensex | 65,512.39 | 65,789.98 | 65,434.61 | -0.73% |
BSE SmallCap | 37,209.94 | 37,528.71 | 37,142.47 | -1.72% |
India VIX | 11.40 | 11.63 | 10.12 | 10.68% |
NIFTY Midcap 100 | 39,744.65 | 39,987.30 | 39,634.70 | -1.34% |
NIFTY Smallcap 100 | 12,609.00 | 12,721.90 | 12,567.45 | -1.78% |
NIfty smallcap 50 | 5,809.35 | 5,865.35 | 5,786.30 | -1.89% |
Nifty 100 | 19,428.90 | 19,504.65 | 19,391.75 | -0.79% |
Nifty 200 | 10,411.75 | 10,454.60 | 10,391.60 | -0.88% |
Nifty 50 | 19,512.35 | 19,588.95 | 19,480.50 | -0.72% |
गुंतवणूकदार होरपळले
मुंबई शेअर बाजारावर (BSE) सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 9 ऑक्टोबर रोजी 315.94 लाख कोटी रुपयांवर घसरले. मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी बाजार भांडवल 319.86 लाख कोटी रुपये होते. आज झालेल्या घसरणीमुळे बाजार भांडवलात 3.92 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्ती 3.92 लाख कोटींनी घसरली.
2804 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण
मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,929 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 993 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 2,804 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर 122 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 240 कंपन्यांच्या शेअर दरांनी त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक दर गाठला. तर 37 कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा 52 आठवड्यांचा नीचांक दर गाठला.