Finance Minister on Rupee Declining : डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाची (Rupee) घसरण सुरुच आहे. रुपयाने मागील काही दिवसांतील ऐतिहासिक निच्चांक गाठला आहे. यावर केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, 'रुपया घसरला नसून डॉलर मजबूत होतोय.' मागील वर्षभरापासून जागतिक पातळीवर रुपया कमकुवत झाला आहे. एकीकडे अर्थतज्ज्ञांनी रुपयाच्या घसरणीवर चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. रुपयांच्या घसरणीबाबत निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे की, रुपयांच्या घसरणीकडे बघताना आपण रुपया कमकुवत होतं आहे असा विचार न करता डॉलर मजबूत होत आहे असा अर्थ लावायला आहे. 


'रुपया घसरला नाही, डॉलर मजबूत होतोय'


अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या सतत सुरु असलेल्या घसरणीबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सितारमण यांनी म्हटलं आहे की, 'रुपया घसरला नसून डॉलर मजबूत होतोय. सध्याच्या परिस्थितीकडे आपण या दृष्टीने पाहायला हवं. याशिवाय भारतीय रुपया जगातील इतर चलनांच्या तुलनेत भारतीय चलनाची स्थिती चांगली आहे.'






रुपयाच्या किमतीत 10 टक्के घसरण


गेल्या वर्षभरापासून रुपयाच्या किमतीत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. यामुळे अर्थतज्ज्ञांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. 2022 वर्षात रुपया 10 टक्क्यांनी घसरला आहे. सध्या रुपयाची किंमत प्रति डॉलर 82.35 आहे. रुपया लवकरच 83 चा आकडा पार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 2022 मध्ये रुपयाच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांची घट झाली आहे. याआधी 2014 मध्ये रुपयाच्या किमतीत विक्रमी 40.50 टक्क्यांची घट झाली होती. मे 2014 मध्ये एक डॉलरची किंमत 58.58 रुपये होती, हीच किंमत आता प्रति डॉलर 82.35 रुपये आहे.


महागड्या डॉलरचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम


अर्थतज्ज्ञांच्या मते, डॉलरचा वाढत्या किमतीचा अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. रुपयाच्या घसरणीमुळे तेल कंपन्यांना अधिक पैसे खर्च करून तेल खरेदी करावं लागेल. अशा स्थितीत इंधनाची आयात महाग होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. त्याशिवाय दरवर्षी लाखो मुले भारतातून परदेशात शिक्षणासाठी जातात. डॉलरच्या वाढत्या किमतीचा बोजा परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर पडेल. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना अधिक शुल्क भरावे लागणार आहे. खाद्य तेल आयात करतानाही सरकारला जास्त पैसा खर्च करावा लागणार आहे. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.