Manava Naik : मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकला (Manava Naik) नुकताच एका धक्कादायक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. मनवाने तिच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगावर भाष्य केलं आहे. पोस्ट शेअर करत तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटोदेखील शेअर केला आहे. 


मनवाने लिहिलं आहे,"माझ्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा. मी रात्री 8.15 च्या आसपास एक उबर केली होती. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या आसपास पोहोचल्यावर तो उबर चालक फोनवर बोलत होता. दरम्यान मी त्याला फोनवर न बोलण्याचा सल्ला दिला. अशातच त्याने एक सिग्नलदेखील तोडला. मी वारंवार सांगून देखील तो त्याची मनमानी करत होता". 


पुढे गेल्यावर पोलिसांनी अडवलं. त्याचा फोटोदेखील क्लिक केला. त्यानंतर उबर चालकाने पोलिसांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. गाडीला फोटो काढला आहे तर आता आम्हाला जाऊ द्या असं मी पोलिसांना सांगितलं. त्यामुळे त्या चालकाला राग आला. तो मला म्हणाला," तू 500 रुपये भरणार आहेस का? त्याला मी म्हटलं,"फोनवर तू बोलत होतास". त्यानंतर त्याने थांब तुला दाखवतो अशा शब्दांत धमकी द्यायला सुरुवात केली.  


उबर चालकाला मी गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्यायला लावली. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गाडी थांबवली. दरम्यान मी त्याला पोलीस स्टेशनला चला सांगत होते. तर तो माझ्यासोबत वाद घालत होता. त्यानंतर मी उबर सेफ्टीला फोन केला. त्यादरम्यानदेखील तो वेगाने गाडी चालवत होता. 


प्रियदर्शनी पार्कात पोहोचलेलो असताना मी जोरजारात हाका मारत ओरडायला सुरुवात केली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. आता मी सुरक्षित आहे. पण या प्रसंगामुळे माझी घाबरगुंडी उडाली आहे." 



मनवा नाईकच्या पोस्टवर नेटकरी कमेंट्स करत मनवाला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. सध्या ही तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. मनवाने ही पोस्ट शेअर करत मुंबई पोलिसांसह, महापालिकेलाही टॅग केले आहे. मनवाचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 


विश्वास नांगरे पाटील यांनीदेखील मनवाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे,"मनवा जी... आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. Dcp झोन 8 यावर काम करत आहे. तसेच चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल". हे उपरे येऊन त्रास देऊ लागलेत. कडक कारवाई केली पाहिजे, काळजी घे मैत्रिणी, अधिकृतरित्या पोलीसात तक्रार केली पाहिजे, अशा कमेंट्स सिनेसृष्टीतील मंडळी करत आहेत. 


संबंधित बातम्या


Kedar Shinde : सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलय...आणि तुम्ही...; पोस्ट शेअर करत केदार शिंदेंची नाराजी