Rupee At All Time Low : भारतीय रुपयात मागील काही दिवसात ऐतिहासिक निच्चांकी दर दिवशी बघायला मिळत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रति डॉलर 80 चा आकडा गाठल्यानंतर आज 82 पार करुन गेलाय. त्यामुळे रुपयाची घसरगुंडी अशीच सुरु राहिल्यास भारताला कच्चा तेलाच्या आयातीसोबतच इतर आयातीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे.
डॉलर आणि रुपयात लागलेली शर्यत डॉलर जिंकताना दिसत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज ऐतिहासिक निच्चांकी गाठली आहे. बाजार बंद होताना रुपया 82.33 प्रति डॉलरवर बघायला मिळत आहे. जो आतापर्यंतचा सर्वाधिक खालचा स्तर आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरवाढीच्या निर्णयानंतर भारतासोबतच अनेक चलनांनी गटांगळ्या खायला सुरुवात केली आहे. जो एक मोठा चिंतेचा विषय आहे. ज्यामुळे आयातीवर मोठा परिणाम बघायला मिळू शकतो. भारताचा रुपया सावरण्यासाठी आरबीआयनं पतधोरण जाहीर करत रेपो रेट वाढवला होता. डॉलरच्या तुलनेत रुपया त्यानंतर स्थिर राहिल अशी अपेक्षा होती. मात्र तसं काही चित्र अद्याप दिसत नाही. 2022 सालात रुपयात 10 टक्क्यांहून अधिकची घसरण बघायला मिळते आहे. दुसरीकडे, हे आकडे आणखी वाढण्याची भीती आहे.
रुपयाच्या अवमूल्यनाचे काय परिणाम?
कच्चा तेलाच्या आयातीला रुपयाच्या अवमूल्यनाचा सर्वात आधी फटका बसेल. कच्चा तेलासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील, ज्याचा थेट परिणाम भारताच्या फॉरेक्स इंडेक्स रिझर्व्हवर बघायला मिळेल. रुपयाचे अवमूल्यन वाढल्याने तेलाच्या बिलात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम थेट महागाई वाढीवर दिसणार आहे. खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इंधन आणि गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट, टीव्ही, मोबाईल, एसी, फ्रिजसारख्या वस्तू महागण्याची शक्यता आहे. परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक भुर्दंड बसेल. परदेशातून येणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे महाग होण्याची शक्यता आहे. परदेशी पर्यटनाचा खर्च देखील महागेल. परदेशी जात वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांना देखील जादा पैसे खर्च करावे लागतील.
दरम्यान, जागतिक बाजारात मंदीचे सावट आहे. दुसरीकडे, भारताला देखील त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. कोव्हिडच्या परिस्थितीतून भारत सावरला होता. अशात युक्रेन-रशिया युद्ध आणि व्याजदरवाढीच्या मारामुळे महागाईचा भस्मासूर बघायला मिळतोय. अशात रुपया आणखी किती खाली घसरणार आणि केंद्र यासंदर्भात काय पाऊलं उचलतं हे बघणं महत्त्वाचे असेल.