Rs 2000 Notes : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) 19 मे 2023 रोजी चलनातून दोन हजार रुपयांची (Rs 2000 notes) नोट मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर या नोटा बँका, पोस्ट ऑफिस आणि आता रिझर्व्ह बँकेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वर्ष 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली. उणेपुरे सात वर्षांसाठी चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांसाठी  आरबीआयने मोठा खर्च केला असल्याची माहिती समोर आली आहे.  


2000 नोटांच्या छपाईवर 17 हजार 688 कोटींचा खर्च


केंद्र सरकारने आज संसदेत याबाबतची माहिती दिली. संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत अर्थ मंत्र्यांना दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत लेखी उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी एकूण 17 हजार 688 कोटी रुपये खर्च करण्यात आले.


नोटा चलनातून मागे का घेतल्या?


काँग्रेसचे लोकसभा खासदार मनीष तिवारी यांनी आरबीआय आणि सरकारला 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या कारणाबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री म्हणाले की, 19 मे 2023 रोजी आरबीआयने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला. करेंन्सी मॅनेजमेंट ऑपरेशननुसार, 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी सांगितले की,  2000 रुपयांच्या 89 टक्क्यांहून अधिक नोटा मार्च 2017 पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या आणि 4 ते 5 वर्षांच्या या नोटांचा अवधी संपुष्टात आला आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, सर्वसामान्यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी इतर मूल्यांच्या बँक नोटा पुरेशा प्रमाणात आहेत.


7.40 लाख कोटी रुपयांच्या मूल्याच्या नोटांचा पुरवठा 


अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 2016-17 ते 2018-19 या कालावधीत आरबीआयने 7.40 लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात आणल्या गेल्या. आता 19 मे 2023 रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांना बँकिंग व्यवस्थेतून मागे घेण्याची घोषणा केली. त्यावेळी 3.56 लाख कोटी रुपये मूल्यांच्या नोटा बँकिंग व्यवस्थेत होत्या.  30 नोव्हेंबरपर्यंत यामध्ये 3.46 लाख कोटी रुपयांच्या नोटा बाजारात पुन्हा आल्या. तर, 9760 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बँकेत आल्या नाहीत.