Retail Inflation:  महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात किकोळ महागाई दरात  किंचित घट झाली आहे.  मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 टक्के इतका होता. तर, एप्रिल महिन्यात हा दर 7.79 टक्के इतका होता. एप्रिल महिन्यातील आकडेवारीने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेची चिंता वाढली होती. 


खाद्य महागाईचा दर मे महिन्यात 7.97 टक्के इतका नोंदवण्यात आला. एप्रिलमध्ये हा दर 8.38 टक्के इतका होता.  एप्रिल महिन्याच्या तुलनेत शहरी भागातील खाद्य महागाई दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात शहरी भागात खाद्य महागाई दर 8.09 टक्के इतका नोंदवण्यात आला होता. हा दर मे महिन्यात 8.20 टक्के इतका झाला आहे. 






केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवर आठ रुपये आणि सहा रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सहा राज्यांनी व्हॅटमध्येही कपात केली. त्यामुळे वाहतूक खर्चात, उत्पादन खर्चात किंचित घट झाली. त्याचा परिणाम हा महागाई दर कमी होण्यात झाला असल्याचे म्हटले जात आहे. 


आरबीआयच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाई 7.5 टक्के आणि पुढील तीन महिन्यांत 7.4 टक्के राहण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत ते अनुक्रमे 6.2 टक्के आणि 5.8 टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे.


रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे.  कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर प्रति बॅरल आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांना तोटा होत असल्याचे म्हटले जात असून इंधन दरवाढीची टांगती तलवार नागरिकांवर आहे.