मुंबई: शेअर बाजारासाठी आजचा काळा दिवस असल्याचं स्पष्ट झालं आहे. शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,456 अंकांनी घसरला तर निफ्टीही 427 अंकांनी घसरला.


अमेरीकेतील महागाईचे परिणाम शुक्रवारी वॉल स्ट्रीटवर बघायला मिळाले होते. त्यात फेडकडून येणाऱ्या बैठकीत व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढविण्याचा विचार असल्यानं त्याचा दबाव जगभरातील बाजारांवर दिसतोय. बाजारातील लिक्विडिटी कमी झाली तर त्याचा फटका शेअर बाजारांना बसत असतो आणि हाच फटका भारतीय शेअर बाजाराला बसलाय. मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री बघायला मिळाली आहे. 


सेन्सेक्समध्ये आज 2.68 टक्क्यांची घसरण झाली असून तो 52,864 स्थिरावला. निफ्टीमध्ये 2.64 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,774 अंकांवर स्थिरावला.


आज शेअर बाजार बंद होताना 650 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 2759 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. 117 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. 


आज शेअर बाजार बंद होताना Bajaj Finserv, Bajaj Finance, Tech Mahindra, IndusInd Bank आणि Hindalco Industries कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर Nestle India आणि Bajaj Auto या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.


बीएसई मिडकॅपमध्ये 2.7 टक्क्यांचा तर स्मॉलकॅपमध्ये 3 टक्क्यांची घट झाली आहे. 


रुपयाने तळ गाठला
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची घसरण झाली आहे. शुक्रवारच्या 77.84 रुपयाच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 78.28 रुपयांवर पोहोचली आहे. रुपयाची ही आतापर्यंतची निचांक्क पातळी आहे. 


आज शेअर बाजार बंद होताना सार्वजनिक बँका, खासगी बँका, आयटी, रिअॅलिटी, कॅपिटल गुड्स, ऑटो, ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 2 ते 4 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ



  • Nestle- 0.47 टक्के

  • Bajaj Auto- 0.01 टक्के


या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण



  • Bajaj Finserv- 7.08 टक्के

  • Bajaj Finance- 5.46 टक्के

  • IndusInd Bank- 5.23 टक्के

  • Tech Mahindra- 5.22 टक्के

  • Hindalco- 5.00 टक्के