नागपूरः नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना नोटीस दिल्यानंतर सोमवारी कॉंग्रेसच्यावतीने नागपूरच्या ईडी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तीन तास चाललेल्या आंदोलनात अचानकपणे शेकडो कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांचा पहिला बॅरिकेट खाली पाडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाच्या मुख्य दारावर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्कीही झाली. मात्र, पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करत त्यांना थांबविले.
यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, सध्या देशात हिटलरशाही सुरू आहे. अहंकारात असलेल्या हिटलरला शेवटी आत्महत्या करावी लागली होती, असे आपल्या देशात होऊ नये. आज काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते देशात विविध ठिकाणी रस्त्यावर आले आहे. हे फक्त ट्रेलर असून संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमकतेने रस्त्यावर उतरले असते तर देशात आग लागली असती. मात्र देश सुरळीत चालावा, देशातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काँग्रेसने संयम बाळगला आहे असल्याचेही यावेळी राऊत आपल्या भाषणात म्हणाले.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकर, अभिजित वंजारी यांच्यासह अनेक माजी मंत्री आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जेव्हा जेव्हा गांधी घराण्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तो राजकारणातून संपला आहे. हा देशाचा इतिहास आहे. जे इंग्रजांना नाही घाबरले ते तुम्हाला थोडी घाबरणार. आपल्या पक्षाचं चुकलं आपण गाफील राहिलो म्हणून देशात भाजपची सत्ता आली. मी नेहमी म्हणतो काँग्रेसमध्ये काम करण्याची ताकद दिली पाहिजे, मात्र आमच्याकडे काहींनी चापलुसी करणाऱ्यांना मोठे केले आणि म्हणून हे बोके सत्तेत जाऊन बसले असल्याची टीकाही स्वपक्षांवर त्यांनी केली.
पोलिसांनी धरणे प्रदर्शनाचा पेंडोल सोडून ईडी कार्यालयाच्या मुख्य दारातून आत शिरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी, प्रतिभा धानोरकर यांच्यासह माजी मंत्री वसंत पुरके व शिवाजीराव मोघे या नेत्यांसह सुमारे 50 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.