मुंबई : रिटेल क्षेत्रातील महागाई चार महिन्यांच्या तुलनेत कमी होऊन 5.22 टक्क्यांवर आली आहे. नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर 5.48 टक्के होता. डिसेंबर 2023 मध्ये तो 5.69 टक्के होता. महागाईचा दर कमी झाल्यानं आता सर्वंचं लक्ष फेब्रुवारीत होणाऱ्या आरबीआयच्या राजकोषीय धोरण ठरवण्याच्या बैठकीकडे लागलं आहे. आरबीआय रेपो दरात कपात करणार का याकडे देखील अनेक जणांचं लक्ष आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये खाद्य पदार्थांचा महागाई दर 8.39 टक्के होता. नोव्हेंबरमध्ये तोच दर 9.04 टक्के होता. डिसेंबर 2023 मध्ये तो दर 9.53 टक्के होता.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2024-25 वर्षांसाठी महागाईचा दर 4.5 टक्क्यांवरुन वाढवून4.8 टक्के केला आहे. खाद्य किमतींवर दबाव असल्यानं ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहिती महागाईचा दर उच्चांकी राहण्याची शक्यता आरबीआयनं व्यक्त केली होती.
रॉयटर्सनं एका सर्व्हेत अंदाज व्यक्त केला होता की डिसेंबरमध्ये भारतात महागाईचा दर 5.3 टक्के राहू शकतो. काही किंमतींमध्ये घसरण झाली असली तरी. 2026 च्या दुसऱ्या सहामाही पर्यंत महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता नाही.
भाज्यांचे दर वाढल्यानं खाद्य पदार्थांच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये महागाई दिसून आली होती. मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यानं आणि उत्पन्न अधिक झाल्यानं येत्या काळात किमती घसरतील असा अंदाज आहे.
यूनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार कनिका पसरिचा यांच्या नुसार महागाईच्या दरात सुधारणा उशिरानं होण्याचं कारण ऑक्टोबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि त्यामुळं भाज्यांच्या दरात उशिरानं झालेले बदल हे होतं. डिसेंबरमध्ये थंडीमुळं खाद्य तेल आणि धान्याच्या किमतीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.
शहरी आणि ग्रामीण भागाला दिलासा
ग्रामीण भागात डिसेंबरमध्ये महागाईचा दर 5.76 टक्के राहिला. नोव्हेंबरमध्ये तो 9.10 टक्के होता. शहरातील महागाई देखील घटली असून नोव्हेंबरमधील 8.74 टक्क्यांवरुन 4.58 टक्क्यांवर आला आहे. या काळात भाज्यांच्या दरात 26.56 टक्के वाढ नोंदवली गेली. नोव्हेंबरमध्ये ती 29.33 टक्केहोती. ऑक्टोबरमध्ये 42.18 टक्के होती. धान्याचा महागाई दर डिसेंबरमध्ये 9.67 टक्के असून तो नोव्हेंबरमध्ये 6.88 टक्के होता. डाळींचा महागाई दर 3.83 टक्क्यांवर आला आहे.
व्याज दर घटणार?
रिटेल महागाई दरात घसरण झाल्यानं आरबीआय फेब्रुवारी महिन्यातील वित्तीय धोरण ठरवण्याच्या बैठकीत रेपो रेट कपातीबाबत घोषणा करु शकते. बऱ्याच काळापासून रेपो रेटमध्ये कपात करण्याची मागणी होत आहे. मात्र, महागाई वाढल्यानं हा निर्णय होत नाही.
फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर 5-7 फेब्रुवारीमध्ये बैठक घेऊ शकतात. त्यावेळी व्याजदर कपात होणार का हे पाहावं लागेल.
इतर बातम्या :
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर