RBI Hike Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन रेपो दर जाहीर करण्यात आला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. सध्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यावर रिझर्व्ह बँकेचे प्रमुख लक्ष्य असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले आहे. आरबीआयच्या नव्या पतधोरणानुसार आता रेपो दर 4.90 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे कर्ज महागणार असून ईएमआयदेखील वाढणार आहे. 


रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महागाई सातत्याने वाढत असून युद्धाचा परिणाम जाणवत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचे जागतिकीकरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना महासाथीनंतरही अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरबीआय पावले उचलत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


कर्ज महागणार


आरबीआयकडून रेपो दरात वाढ झाल्याने आता कर्जे महाग  होणार आहे. आधीच कर्ज घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते वाढणार आहे. रेपो दर वाढल्याने नवीन कर्ज घेणाऱ्यांना अधिक व्याज दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. 


मागील बैठकीतही दरवाढ


गेल्या महिन्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. 4 मे रोजी झालेल्या पतधोरण बैठकीनंतर RBI ने अचानक रेपो दर 40 बेसिस पॉईंट्सने वाढवला होता.कॅश रिझर्व्ह रेशो 50 बेसिस पॉईंट्सने 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांवर नेला.


>> रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.


>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.