Reliance Industries : भारतीय बाजारपेठेवरील आपली पकड आणखी घट्ट करण्यासाठी रिलायन्स उद्योग समूहाने कंबर कसली आहे.  भारतातील प्रत्येक घराघरात रिलायन्सचे नाव पोहचावे यासाठी मुकेश अंबानी यांनी मेगा प्लान आखला आहे. आगामी काळात रिलायन्स उद्योगसमूह अधिक आक्रमकपणे भारतीय बाजारपेठेत आपला विस्तार करणार असल्याचे हे संकेत असल्याचे म्हटले जात आहे. 


भारतातील रिटेल क्षेत्रात रिलायन्स आपले वर्चस्व तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्याच्या घडीला रिलायन्स समूह हा देशातील मोठा रिटेलर आहे. रिलायन्स उद्योग समूहातील कंपनी Reliance Retail अंतर्गत ही कंपनी कार्यरत आहे. 


30 ब्रॅण्ड खरेदी करणार


फक्त रिटेल क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याचे रिलायन्स उद्योग समूहाची महत्त्वकांक्षा नाही. त्याही पुढे जात आगामी काळात ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन करणारी कंपनी होण्याचे लक्ष्य आहे. भारतीय बाजारपेठेतील युनिलिव्हर, पेप्सीको, नेस्ले आणि कोका-कोला सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देण्यासाठी रिलायन्सचे प्रयत्न सुरू आहेत. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्स उद्योगसमूहाकडून Reliance Retail Consumer Brands पुढे आणत आहे. रिलायन्सने आगामी सहा महिन्यात किराणा माल, गृहपयोगी वस्तू, पर्सनल केअर आदींशी निगडीत जवळपास 50-60 ब्रॅण्डचा पोर्टफोलिओ तयार करत असल्याचे म्हटले जात आहे. 


'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, रिलायन्सकडून भारतातील 30 स्थानिक लोकप्रिय ग्राहकोपयोगी वस्तूंशी निगडित असलेल्या ब्रॅण्ड सोबत चर्चा सुरू आहे. रिलायन्स या कंपन्यांना खरेदी करू शकतो अथवा संयुक्त भागिदारीत व्यवसाय करू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली. यासाठी रिलायन्स किती खर्च करणार आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्सने रिटेल व्यवसायात दरवर्षी जवळपास 500 अब्ज डॉलरची विक्री करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. मात्र, रिलायन्स उद्योग समूहाने याबाबत अधिकृतपणे कोणतेही भाष्य केले नाही. 


रिलायन्स रिटेलकडून सध्या देशभरात जवळपास 2000 स्टोअर्स चालवले जातात. तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म जिओ मार्टलादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, याद्वारे रिलायन्सऐवजी इतर कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री केली जाते. आता, रिलायन्सला आपल्या कंपनीसोबत देशातील प्रत्येक घराला जोडायचे आहे. 


Ambit Capital चे आलोक शाह यांनी सांगितले की, जुन्या आणि मोठ्या कंपन्यांच्या ब्रॅण्डची आपली एक ओळख असते. अशा कंपन्यांसोबत स्पर्धा करणे आव्हानात्मक असते. त्यामुळेच रिलायन्सकडून ब्रॅण्डचे विलीनीकरण आणि संबंधित कंपनी खरेदी करणे आदी धोरण अवलंबले जाते. या धोरणामुळे रिलायन्ससाठी काही गोष्टी सोप्या होतात. मात्र, कंपनीला वितरण आणि किंमतीच्या बाबतीत विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.