मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) जगभरात व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातच रिलायन्स रिटेल कंपनी (Reliance Retail Ltd) देशविदेशात आक्रमक पद्धतीने विस्तार करताना दिसून येत आहे. रिलायन्स रिटेल इंडस्ट्रीज (RRL) देशातील सर्वात मोठी लिस्टेड कंपनी आहे. या कंपनीची जबाबदारी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीवर आहे. सध्या ईशा अंबानीवर कर्जाचं ओझं जास्त असल्याचं समोर आलं आहे. रिलायन्स रिटेल कंपनी जगभरात आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. यामुळे ईशा अंबानीच्या या कंपनीवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे.


ईशा अंबानीच्या रिलायन्स रिटेलवर कर्जाचं ओझं


रिलायन्स रिटेल इंडस्ट्रीजने व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेतलं आहे. एका रिपोर्टनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीवर जास्त कर्ज आहे. गेल्या वित्तीय वर्षापेक्षा यंदा रिटेल कंपनीवर कर्जाचा बोजा वाढला आहे. रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या वार्षिक अहवालानुसार, कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बँकाँकडून 32,303 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या तुलनेनं मागील वर्षी रिलायन्स रिटेल कंपनीवर नॉन करंट, लाँग टर्म आणि इतर कर्जाची एकूण रक्कम 19,243 कोटी रुपये होती. 2021-22 आर्थिक वर्षाच्या शेवटी कंपनीवर फक्त 1.74 कोटींचं कर्ज होतं. मात्र, आता या कर्जामध्ये मोठी वाढ झाली आहे.


एका वर्षात कर्जात 73 टक्क्यांची वाढ


रिलायन्स रिटेल लिमिटेडनेही मालकी असलेली कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून 13,304 कोटी रुपयांचं दीर्घकालीन कर्ज (Long Term Loan) घेतलं आहे. त्यामुळे रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​एकूण कर्ज 70,943 कोटी रुपये झालं आहे. हा आकडा एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 73 टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीने कर्जाच्या रकमेचा वापर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी केला आहे, यामध्ये स्टोअर-आउटलेट उघडणे आणि नवीन ब्रँड्स घेणं या गोष्टींचा समावेश आहे.


वर्षभरात अनेक नवीन स्टोर्स उघडली


आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेल लिमिटेडने 3,300 हून अधिक नवीन आउटलेट उघडले आहेत. यामुळे, मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या एकूण आउटलेटची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​नवीन आउटलेट्स उघडण्याची गती यावर्षीही कायम राहण्याची अपेक्षा आहे, कारण कंपनी देशातील छोट्या शहरांवर लक्ष केंद्रित करत आहे, जिथे आधुनिक किरकोळ आऊटलेट्स उपलब्ध नाहीत.


कंपनीच्या मालमत्तेत मोठी वाढ


रिलायन्स रिटेल लिमिटेडच्या वार्षिक अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीची गैर-चालू मालमत्ता 96 टक्क्यांनी वाढून 79,357 कोटी रुपये झाली आहे. त्यापैकी मालमत्ता, प्लांट आणि उपकरणे हे वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 180 टक्क्यांनी वाढून त्यांची रक्कम 39,311 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यावरून कंपनीने मोठ्या प्रमाणावर विस्तार योजनांसाठी कर्जाचा वापर करत असल्याचं दिसून येत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीचे कर्ज-ते-इक्विटी प्रमाण 1.35 टक्के होते, ते आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1.91 टक्के झालं आहे.


संबंधित इतर बातम्या : 


Ambani Family : आशियातील श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांचं शिक्षण किती? 'या' शाळा-कॉलेजमधून शिक्षण; रंजक माहिती जाणून घ्या...