बीड: धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथून बीडकडे येत असणाऱ्या रिक्षाला बीडवरून परळीकडे जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि चिरडलं.  या भीषण अपघातात (Accident) रिक्षातील आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आहे. गंभीर जखमी रुग्णाला उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा भीषण अपघात बीड-परळी रोडवरील बकरवाडी फाट्यावर घडला.


भीषण अपघातात तीन जण ठार


अजीम शेख (रा. इस्लामपुरा राजू चौक) हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह सकाळी धारूर तालुक्यातील थेटे गव्हाण येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रविवारी रात्री तिथून परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरने आपला ताबा सुटला, त्यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला (एमएच 20 एफएफ 0312) जोराची धडक बसली, यामध्ये नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13) आणि अदनान अजीम शेख (वय 12) हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाले. या धक्कदायक घटनेत रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीडच्या काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.


दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्येही अपघात, 4 ठार


नाशिकसह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच असून ग्रामीण भागात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तसंच नाशिक पेठ मार्गावर देखील वाढती वाहतूक अपघातांना निमंत्रण देत असते, त्यामुळे सातत्याने या मार्गावर अपघात होत आहेत. या महामार्गावर शुक्रवारी (8 सप्टेंबर) करंजाळीजवळ बस आणि कारचा भीषण अपघात घडला, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांचा नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. 


नेमका अपघात कसा झाला?


गुजरात राज्यातील वळसाद येथील चौघे मित्र हे कारने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला फिरायला गेले होते. त्यानंतर ते पुन्हा वळसादकडे पेठ धर्मपुरी मार्गाने निघाले होते. मात्र वाटेत करंजाळी गावाजवळ एका वळणावर ओव्हरटेक करत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार थेट दुसऱ्या लेनमधून जात असलेल्या एसटी बसला धडकली. समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केलं. या अपघातात बसमधील काही प्रवाशीही किरकोळ जखमी झाले.


हेही वाचा: 


ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला, सात मजुरांचा दुर्दैवी मृत्यू